Ghod River Pollution : नदी की डंपिंग ग्राऊंड? घोड नदीत कचऱ्याचे ढीग; थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Ghod River Pollution : घोड नदीच्या तीरावर प्लास्टिक आणि टाकाऊ पदार्थांची फेकाफेक; परिसरातील हवा, पाणी आणि पर्यावरण दूषित झाल्याने नागरिकांमध्ये संताप.

Ghod River Pollution – आंबेगाव तालुक्यातील घोड नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा व घाण तात्काळ बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंबेगाव तालुका युवक अध्यक्ष विशाल जालिंदर वाबळे यांनी सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, घोड नदीच्या तिरावर घोडेगाव ग्रामपंचायत तसेच काही ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा, प्लॅस्टिक व इतर टाकाऊ पदार्थ टाकले जात आहेत.त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून परिसरातील हवा,पाणी व पर्यावरण दूषित होत आहे. तसेच संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाला असून सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या नदी परिसरात विविध गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना असल्यामुळे दूषित पाण्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दुर्गंधी, डासांचे वाढते प्रमाण तसेच पावसाळ्यात नदीपात्रातून कचरा वाहून जाऊन संपूर्ण परिसर प्रदूषित होण्याचा धोका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे तसेच पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन होत असल्याने संबंधित ग्रामपंचायत व कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विशाल वाबळे यांनी केली आहे. तसेच घोडनदी परिसराची तात्काळ पाहणी करून नदीपात्रात कचरा टाकणे बंद करण्याचे आदेश द्यावेत, या ठिकाणचा कचरा हटवून योग्य व्यवस्थापन करावे तसेच भविष्यात नदीपात्रात कचरा टाकला जाणार नाही.यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.





