Jawai Pattern – जुन्नर उपवनविभागातील वाढता मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजस्थानमधील प्रसिद्ध ‘जवाई’ परिसराचा विशेष अभ्यास दौरा केला. बिबट्यांसोबत सहअस्तित्व राखण्याच्या अनोख्या मॉडेलमुळे जवाई पॅटर्नची देशभर चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जुन्नरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या मॉडेलचा कशा प्रकारे वापर करता येईल, याचा सखोल आढावा या पथकाने घेतला आहे. या अभ्यास दौऱ्यात जवाईतील स्थानिक ग्रामस्थ, वन अधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञांशी संवाद साधून बिबट्यांसोबतचा संघर्ष कसा शून्य करण्यात आला, याची माहिती घेण्यात आली. या भागात बिबट्यांची संख्या मोठी असूनही स्थानिक लोकांनी भीतीऐवजी समजूतदारपणा आणि धार्मिक श्रद्धेतून सहजीवनाचा मार्ग स्वीकारला आहे. पथकाने बिबट्यांच्या अधिवासाचे संवर्धन, पशुधनाचे संरक्षण आणि रात्रीच्या हालचालींवर नियंत्रण राखण्याच्या पारंपरिक व आधुनिक पद्धतींचा बारकाईने अभ्यास केला. स्थानिकांना विश्वासात घेऊन राबवल्या जाणाऱ्या योजना जुन्नरमध्ये लागू करण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला. बिबट्या या महत्त्वपूर्ण दौऱ्यात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार शरद सोनवणे, आमदार अमोल खताळ, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. जवाई पॅटर्नच्या धर्तीवर स्थानिक परिस्थितीनुसार बदल करून उपाययोजना राबवल्यास जुन्नरमधील संघर्षात निश्चित घट होईल, असा विश्वास दौऱ्यातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी केवळ प्रतिबंधात्मक उपाय न करता सहजीवनाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे या दौऱ्यातून अधोरेखित झाले आहे. आता जवाई येथील अनुभवाचा वापर करून जुन्नरमधील बिबट्यांचा प्रश्न कितपत यशस्वीपणे हाताळला जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यामुळे वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वयाचे नवीन धोरण आखले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.