Mundhwa Land – मुंढवा येथील भारतील वनस्पती सर्वेक्षण संस्थेकडे (बॉटॅनिकल गार्डन) असलेली जागा याच संस्थेला कायमस्वरुपी कब्जेहक्काने देण्याची शिफारस खारगे समितीने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. मुंढवा येथील सर्वे क्र. ८८/१ ते ८८/२६ ही जमीन राज्य शासनाने काही अटींवर काहींना कसण्यासाठी दिली होती. शेतसारा न भरल्यामुळे १९५५ मध्ये ही जमिनी सरकारकडून खालसा करण्यात आली. १९७७ मध्ये ही जमिनी १५ वर्षांच्या भाडेपट्ट्याने केंद्र सरकारच्या भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेला देण्यात आली. भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर १९८८ मध्ये पुन्हा ५० वर्षांच्या भाडेकराराने जमीन देण्यात आली. या जागेचा सहा वर्षांपूर्वी सातबारा उतारा बंद मालमत्ता पत्रक झाले. या बंद झालेल्या सातबारा उताऱ्यावर कब्जेदार, मालकी हक्क सदरी मुंबई सरकार, अशी नोंद आहे. असे असतानाही ही जमिनी शीतल तेजवानी यांनी कुलमुख्यातरपत्र घेऊन ती अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील यांना विकली. तर सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनी त्याचा खरेदी दस्त नोंदविला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य शासनाने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. समितीने दिलेल्या अहवालात, ही जमीन भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या ताब्यात असून येथे दुर्मिळ व लुप्त होणाऱ्या प्रादेशिक वनस्पतींच्या प्रजातींचे जतन, संवर्धन, संशोधन असे महत्त्वाचे प्रकल्प राबविले जात आहेत. या प्रकल्पाचे बळकटीकरण करणे हा राष्ट्रीय स्तरावरील प्राधान्याचा विषय आहे. हे अत्यंत महत्त्वाचे व मौलिक स्वरूपाचे काम असल्याने ही जागा कायमस्वरूपी भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेला कब्जेहक्काने देण्याबाबत समितीने शिफारस केली आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा. राज्य शासनाने त्यास मान्यता देऊन ही जागा कायमस्वरूपी कब्जेहक्काने संस्थेला देण्याची कारवाई तत्काळ करावी, अशी शिफारस या अहवालात केलेली आहे.