Pune News : पोलिसांना मोठा झटका! ज्ञात भाषेत अटकेची कारणे न देणे पडले महागात; कोर्टाने आरोपीची अटक ठरवली बेकायदेशीर
Pune News : कायद्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निकाल समोर आला आहे.

Pune News : आरोपीला समजेल अशा भाषेत अटकेची कारणे न सांगणे हे घटनाबाह्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. महिलेला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा निष्कर्ष काढत तिला तात्काळ सोडून देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. व्ही. श्रीखंडे यांनी दिला आहे. (Pune News)
या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. मंदार दानवले यांनी युक्तिवाद करून पोलिसांच्या कायदेपद्धतीवर आणि मूलभूत हक्कांच्या उल्लंघनावर बोट ठेवले. त्यांना अॅड. निलेश प्रजापती, अॅड. ऋषिकेश शेलार, अॅड. अजय ताकवणे, अॅड. अनिकेत जांभूळकर, अॅड. रविराज पाटील, आणि अॅड. श्रीनाथ वाडकर यांनी सहकार्य केले. (Pune News)
सांगली जिल्ह्यातील एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात हिंजवडी येथील महिलेला पोलिसांनी अटक केली. ट्रान्झिट रिमांडसाठी न्यायालयात सादर केले. (Pune News)
त्यावेळी पोलिसांच्या कारवाईतील गंभीर कायदेशीर त्रुटी समोर आल्या. पोलिसांकडून अटकेची कारणे केवळ मराठी भाषेत लिहिलेली होती, तर आरोपी महिलेला फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत होती. तिला तिच्या भाषेत अटकेची कारणे समजावून सांगण्यात पोलीस अपयशी ठरले. (Pune News)
तसेच अटकेच्या माहितीपत्रावर आरोपीची स्वाक्षरी नव्हती आणि तिच्या फरार पतीला केवळ व्हॉट्सॲपवर माहिती दिल्याचा पोलिसांचा दावा न्यायालयाने अमान्य केला. सर्वोच्च न्यायालयाच्या मिहीर राजेश शहा विरुद्ध महाराष्ट्र शासन या न्यायनिवाड्याचा दाखला देत महत्त्वपूर्ण निकाल दिला. पोलिसांचा ट्रान्झिट रिमांडचा अर्ज फेटाळून लावला. (Pune News)





