Ghod Dam: शेतकर्यांना दिलासा! ‘घोड’ धरणात ८२ टक्के पाणीसाठा; दोन्ही कालव्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरू
Ghod Dam: घोड धरणामुळे पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-कर्जत तालुक्यातील २०,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली.

Ghod Dam – शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या शेतीसाठी जीवनदायिनी ठरणार्या चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणात सध्या 82 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून 150 क्युसेक, तर डाव्या कालव्यातून 300 क्युसेक वेगाने शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली.
घोड धरणाची एकूण जलसाठा क्षमता 7,638 दशलक्ष घनफूट असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 5,467 दशलक्ष घनफूट, तर मृत पाणीसाठा 2,172 दशलक्ष घनफूट आहे. धरणातून उजव्या कालव्याद्वारे 30 किलोमीटर आणि डाव्या कालव्याद्वारे 84 किलोमीटर परिसरातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्यावर रांजणगाव औद्योगिक वसाहत, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना तसेच शिरूर, काष्टी, श्रीगोंदा आणि परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही अवलंबून आहे.
घोड धरणामुळे शिरूर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील मिळून सुमारे 20 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्यामुळे या भागातील शेतीला मोठा आधार मिळतो. धरणाच्या खालच्या बाजूस शिरसगाव काटा, धनगरवाडी, इनामगाव, नलगेमळा, गांधले मळा, तांदळी खोरे आणि तांदळी संगम येथे उभारण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांनाही घोड धरणातील पाण्याचा मोठा लाभ होतो. धरणातील समाधानकारक पाणीसाठा आणि कालव्यांतून सुरू झालेला पाण्याचा विसर्ग यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामाला बळ मिळाले आहे.




