Devendra Fadnavis: मुंबई-पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत! मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ‘बुलेट ट्रेन’बाबत मोठी अपडेट
Devendra Fadnavis: मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार; रांजणगावात 'जॅबिल' कंपनीच्या विस्तार प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन.

Devendra Fadnavis – मुंबई-पुणे बुलेट ट्रेनमुळे दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडून महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन विस्तार प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, आमदार दिलीप वळसे पाटील, ज्ञानेश्वर कटके, राज्याचे उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, जॅबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे,
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र देशातील डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत असून भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता राज्यात विकसित होत आहे. त्यामुळे डेटा सेंटर, डीप टेक, इलेक्ट्रॉनिक्स, चिप उत्पादनाशी संबंधित संपूर्ण उद्योग परिसंस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
फडणवीस म्हणाले, जबिलच्या अत्याधुनिक प्रकल्पात दिसणारी अचूकता, प्रगत तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नवकल्पना भारतातील उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत. भारत आज इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यातीमध्ये मोठी झेप घेत असून मोबाइल उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर झाल्यानंतर आता सेमीकंडक्टर आणि चिप निर्मिती क्षेत्रातही देशाने भक्कम पाऊल टाकले आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जबिलच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पाचे कौतुक करत भारताला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील विश्वासार्ह भागीदार बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एन. शुक्ला, जबिलचे कार्यकारी उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) अँडी प्रिस्टली यांनीही मनोगत व्यक्त केले.
औद्योगिक पट्ट्यात गैरप्रकार चालणार नाही
फडणवीस म्हणाले, रांजणगाव परिसरात महावितरण (एमएसईडीसीएल) चे स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करण्यबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेली कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत या औद्योगिक पट्ट्यात पोलिस यंत्रणा अधिक बळकट करण्यात येईल आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.






