Khadakwasla Dam: मुठा नदी दुथडी भरून वाहिली! खडकवासला धरण साखळीत पावसाची तुफान बॅटिंग; पाहा पाणीसाठा
Khadakwasla Dam: चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; टेमघरमध्ये सर्वाधिक २४५ मिमी, तर वरसगावमध्ये १८९ मिमी पावसाची नोंद.

Khadakwasla Dam – खडकवासला धरणात पावसाचा जोर वाढल्याने बुधवारी रात्रीपासून धरणातून मुठा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस ८४२ क्युसेकने, त्यानंतर टप्पाटप्प्याने वाढ करत पहाटे पाच वाजता २७ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. यंदाच्या पहिल्यांदाच खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरून वाहत होती. यामुळे शहरातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने चारही धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. खडकवासला धरण ८० टक्के भरल्याने धरणातून रात्री १२ वाजता पाणी सोडण्यात आले. त्यानंतर यामध्ये वाढ करण्यात आली. दुपारनंतर धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने रात्री आठ वाजता विसर्ग कमी करून १५ हजार १५७ क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
या चारही धरणांत बुधवारी पहाटे पावसाचा जोर सर्वाधिक होता. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सकाळी सहा वाजता या कालावधीत खडकवासला धरणात १०१ मिमी, पानशेतमध्ये १७१ मिमी, वरसगाव धरणात १८९ मिमी आणि टेमघरमध्ये २४५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
धरणांतील पाणीसाठा
खडकवासला धरण ९३ टक्के भरले असून, धरणात १.८३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पानशेतमध्ये ५.६५ टीएमसी म्हणजे ५३ टक्के, वरसगाव धरणात ६.२६ टीएमसी म्हणजे ४९ टक्के, तर टेमघर धरणात १.२२ टीएमसी म्हणजे ३३ टक्के पाणीसाठा झाला आहे.





