IND vs SA : गंभीर-पंड्या यांच्यात ड्रेसिंग रूममध्ये जोरदार खडाजंगी? व्हायरल व्हिडिओने खळबळ!

Gautam Gambhir Hardik Pandya Video Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला ५१ धावांनी मानहानिकारक पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे ही मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. पंजाबमधील मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी मोठ्या प्रमाणात धावा दिल्या आणि त्यानंतर फलंदाजांची कामगिरीही सुमार राहिली.
गंभीर-पंड्या यांच्यात वाद?
या पराभवामुळे संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा प्रश्नांच्या घेऱ्यात आले आहेत. दरम्यान, या पराभवानंतर गंभीर आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांच्यातील एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुल्लानपूरच्या मैदानावर भारताच्या या मोठ्या पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रूममध्ये तणावाचे वातावरण दिसून आले. सामना संपल्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Heated conversation between Hardik and Gambhir 👀pic.twitter.com/VtISwnS2FN
— Amar💫 (@KUNGFU_PANDYA_0) December 12, 2025
या व्हिडिओमध्ये मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि हार्दिक पंड्या यांच्यात गंभीर स्वरूपाची चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना काही चाहत्यांनी असा दावा केला आहे की, या पराभवानंतर गंभीर आणि पंड्या यांच्यात जोरदार वाद झाला. तथापि, व्हिडिओमध्ये ऑडिओ नसल्यामुळे ते नेमक्या कोणत्या विषयावर बोलत होते, याचा अंदाज लावणे कठीण आहे.
हेही वाचा – क्रिकेट जगतात खळबळ! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचे 4 खेळाडू निलंबित, ACA ने उचलले मोठे पाऊल
फलंदाजी क्रमातील बदल पडले महागात –
या सामन्यात टीम इंडिया २१४ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ १६२ धावांवर गारद झाली. सातत्याने फ्लॉप ठरत असलेला शुबमन गिलला खातेही उघडता आले नाही. तसेच, अक्षर पटेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २१ चेंडूंमध्ये फक्त २१ धावाच करू शकला.
कर्णधार सूर्यकुमार यादवलाही फक्त ५ धावा जोडता आल्या, तर हार्दिक पंड्याने २३ चेंडू खेळून केवळ २० धावांचे योगदान दिले. तिलक वर्माने ६२ धावांची लढवय्यी खेळी केली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या सामन्यात काहीच फलंदाज त्यांच्या नियमित क्रमावर खेळले, तर अनेक खेळाडूंना नवीन भूमिका देण्यात आल्या, जे संघाला महागात पडले.
हेही वाचा – मेस्सी मैदानात आला अन् ‘या’ कारणामुळे चाहते संतापले; थेट बाटल्या अन् खुर्च्या फेकत घातला गोंधळ
धर्मशालेत तिसरा सामना
दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना १४ डिसेंबर रोजी धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांना या सामन्यातून मालिकेत आघाडी घेण्याची मोठी संधी असेल आणि टीम इंडिया दमदार पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.





