Women’s T20 World Cup 2024 (Final) : न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आज विजेतेपदासाठी भिडणार….

Women’s T20 World Cup 2024 (NZ vs SA) :- कर्णधार सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने अंतिम फेरीत धडक मारली असून अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडने साल 2000 मध्ये विश्वकरंडक उंचवाला होता. सध्याच्या संघात त्या संघातील एकही सदस्य नाही. त्यामुळे कर्णधार सोफी डिव्हाईनला आयसीसी विश्वकरंडक उंचावण्याची चांगली संधी असणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडने या प्रकारातील 10 समाने गमावले होते. मात्र डिव्हाईनच्या नेतृत्वाखाली सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी आश्चर्यकारक कामगिरी करताना संघाला अंतिम फेरीत पोहचविले आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू असलेल्या सोफी डेव्हाईन, सुझी बेट्स आणि ली ताहुहू यांचा हा शेवटचा विश्वकरंडक असण्याची शक्यता आहे.
सोफी डिव्हाईन या 35 वर्षीय खेळाडूने 7000 पेक्षा अधिक तर सुझी बेट्स या 37 वर्षीय खेळाडूने 10 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ताहूहूच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 112 तर टी-20 मध्ये 91 बळींची नोंद आहे. त्यामुळे या तीनही खेळाडू विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील.
दक्षिण आफ्रिका संघाला 2023 च्या स्पर्धेत अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळी केवळ 19 धावांनी त्यांना विश्वकरंडक स्पर्धेवर मोहोर लावता आली नवहती. त्यामुळे यावेळी न्यूझीलंड सारख्या चांगल्या संघाला पराभूत करून विजेतेपद मिळविण्यासाठी ते चांगले झुंजतील.
It’s the last chapter of #T20WorldCup 2024 🏆
Everything you need to know ahead of the big final between South Africa and New Zealand ⬇️https://t.co/Xwfo9VhGvT
— T20 World Cup (@T20WorldCup) October 20, 2024
स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिज संघाला तर दक्षिण आफ्रिका संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले. स्पर्धेच्या सुरुवातीलाच न्यूझीलंड संघाने भारताला 60 धावांनी पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने त्यांना 60 धावांनी पराभूत केले. मात्र त्यानंतर किवी संघ खचला नाही. श्रीलंका संघाला न्यूझीलंडने 8 गडी राखून पराभूत करताना उपांत्य फेरीचे लक्ष्य साध्य केले. शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिज संघाचे आव्हान मोडून काढताना तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करताना सलग आठव्यांदा अंतिम फेरीत पोहचण्यापासून रोखले. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड (190 धावा) आणि तझमिन ब्रिट्स (170 धावा) यांनी दमदार फलंदाजी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. या जोडीवर दक्षिण आफ्रिका संघाची मदार असून ॲनेके बॉश आणि मारिझान कॅप यांना देखील लढावे लागणार आहे.
दोन्ही संघ खालीलप्रमाणे…
न्यूझीलंड: सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इसाबेला गेझ (यष्टिरक्षक), मॅडी ग्रीन, ब्रूक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, अमेलिया केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे , लया तहहू.
दक्षिण आफ्रिका : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, मिके डी रिडर (यष्टिरक्षक), अयांडा हलुबी, सिनालो जाफ्ता (यष्टिरक्षक), मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, नॉनकुलुलेको मलाबा, शेषनी नायडू, तुमी सेखुखुने, क्लो ट्रायॉन.





