Ganpati utsav 2023 : दगडूशेठ गणपतीची मिरवणूक; मोहन भागवत यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठापना

पुणे – आज देशभरात गणपतीचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन होण्यास सुरूवात झाली असून सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुणे आणि मुंबईत खास करून गणपतीचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. यावर्षी देखील पुण्यनगरी गणपतीच्या स्वागतासाठी सजली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा देखील कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यानंतर आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामधून (Dagdusheth Halwai Ganapati) मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून मिरवणुकीला श्री हनुमानाच्या ४ मूर्ती असलेल्या फुलांच्या रथातून सुरुवात झाली आहे.
यंदा पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीसाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मंदिराचे हे खास आकर्षण असणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर भाविकांची ही देखील मोठी गर्दी जमली आहे. यामुळे पुण्यनगरी गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
मिरवणुकीचा मार्ग
मुख्य मंदिर, आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बॅंड, प्रभात बॅंड, मयूर बॅंड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे.





