ऐतिहासिक निर्णय…! विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीपाठोपाठ दगडूशेठ गणपती बाप्पा होणार मार्गस्थ

पुणे – आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ, त्यावर उभारलेला रणशिंग पुष्प चौघडा आणि रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी, सोबतीला मर्दाणी खेळांसह ढोल-ताशांचा दणदणाट अशा दिमाखदार, अशा भावपूर्ण आणि तितक्यात जल्लोषात लक्षवेधक मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पांना निरोप देण्यात येतो मात्र दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
माध्यमांशी संवाद साधतांना अध्यक्ष माणिकदादा चव्हाण यांनी माहिती दिली की,’मागील वर्षी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले होते. भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, मानाचा पहिला कसबा गणपती 10.30 वाजता सुरू होतो. त्यानंतर इतर मानाचे गणपती मार्गस्थ होतात. 3 ते 4 नंतर 5 ही गणपती मार्गस्थ होतात. त्यानंतर बेलबाग चौक रिकामा होतो. त्यावेळी आम्ही मिरवणूक सुरू करणार आहोत. दुपारच्या वेळेत अंतर पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील इतर मंडळांना विसर्जनाला उशीर होणार नाही.





