Ganja Seized: चाकणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल ४२ लाखांच्या गांजा जप्त, कोथरूडच्या तरुणासह दोघांना बेड्या
Ganja Seized: पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची खंडोबामाळ चाकण परिसरात सायंकाळी मोठी कारवाई.

Ganja Seized – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण परिसरात मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ८३ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) सायंकाळी करण्यात आली. अनिकेत राजेंद्र बिरंगल (२४, खंडोबामाळ, चाकण), कुशल उद्धव पाठक (२४, सुतारदरा, कोथरूड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबा माळ चाकण येथे गस्त घालत असताना अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल निखिल वर्पे आणि विजय दौंडकर यांना माहिती मिळाली कि, एका स्कॉर्पिओ मधून दोघेजण गांजा घेऊन जात आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयित स्कॉर्पिओ वाहन अडवले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ८३ किलो ९६० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी ४१ लाख ९८ हजारांचा गांजा, ७५ हजारांचे तीन मोबाइल फोन,
५१० रुपये रोख रक्कम आणि १५ लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी जप्त केली. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कुठून गांजा आणला आणि तो कुठे विकण्यासाठी जात आहेत, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक रोहित दिवटे, जिलानी मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल जावेद बागसिराज, ज्ञानेश्वर मुळे, किशोर परदेशी, निखिल शेटे, विजय दौंडकर, सदानंद रुद्राक्षे, निखिल वर्पे, कपिलेश इगवे, सुभाष गुरव, प्रकाश ननावरे यांच्या पथकाने केली आहे.



