Pimpri Chinchwad Crime – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ लाख १२ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन ड्रग्ससह (एमडी) तिघांना अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (२७ जानेवारी) रात्री चिंचवड येथील बिजलीनगर चौक परिसरात करण्यात आली.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशना सैतानराम देवासी (२५, बिजलीनगर), मेकाराम ऊर्फ शाम नारायणराम देवासी (२६, बिजलीनगर) आणि पुरण चौथाराम देवासी (२४, कात्रज, पुणे) यांना अटक केली आहे. बिजलीनगर परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे १४२ ग्रॅम २३० मिली ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ सापडले. अधिक चौकशीत हा माल त्यांनी कात्रज येथील पुरण देवासी याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले. पोलिसांनी अंमली पदार्थासह एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.