Satara: सातारा शहरात बाईक रायडरचा धुमाकुळ, वाहतूक पोलीस गांधारीच्या भूमिकेत; अपघाताच्या भीतीने अनेकांचा जीव मुठीत
Satara शहरात ग्रेड सेपरेटर बांधूनही वाहतूक कोंडी कायम आहे. दिवसभर वाहनधारकांना कोंडीतून प्रवास करावा लागत आहे. ही कोंडी डोकेदुखी ठरत असताना यात बाईक रायडर आणखी भर घालत आहेत.

Satara: सातारा शहरात वाहतुकीच्या समस्या डोकं वर काढून उभ्या असताना यात बाईक रायडर आणखी भर घालत आहेत. दिवसभर बेभान होऊन दुचाकी चालवण्यात येत आहेत. यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. वाहतूक पोलीस गांधारीच्या भूमिकेत असल्याने कारवाईचा धाक उरला नसल्याची चर्चा शहरात होत आहे.
शहरात ग्रेड सेपरेटर बांधूनही वाहतूक कोंडी कायम आहे. दिवसभर वाहनधारकांना कोंडीतून प्रवास करावा लागत आहे. ही कोंडी डोकेदुखी ठरत असताना यात बाईक रायडर आणखी भर घालत आहेत. पोवई नाका, शाहूनगर, राजपथ, कर्मवीर भाऊराव पाटील पथ, माजी राज्यपाल गणपतराव तपासे पथ (राधिका रस्ता), गोडोली, सदरबझार, मोळाचा ओढा, शाहूपुरी या भागांतील रस्त्यांवर दररोज बाईक रायडर वेगाने गाडी चालवत आहेत.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि रात्री उशिराही यांच्या फेऱ्या सूरु असतात. जाणीवपूर्वक कट मारुन जाणे, मोबाइल फोनवर बोलणे, युवती दिसताच जवळ जाऊन रेस वाढविणे असे प्रकार करतात. करंजे येथील झेंडे चौकात काही दिवसांपूर्वी एका बाईक रायडरने समोरुन येणाऱ्याया दुचाकीला कट मारताच अपघात झाला. दोन्ही दुचाकी घासल्याने वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने मोठा अपघात झाला नाही. अशा घटना इतर भागातही होत आहेत. वाहतूक पोलीस ठराविक ठिकाणीच थांबत असल्याने हे रायडर यांचा फायदा घेत आहेत. रात्री बारा वाजेपर्यंत हे रायडर विनाकारण दंगा करत फिरत असतात. परंतु, हे रोजचेच आहे म्हणत दुर्लक्ष केले जातआहे.
काही परिसरात बसून दारुचे सेवन करतात. नशेत शिवीगाळ करतात. ठराविक ठिकाणी पोलीस पोहचत नसल्याने कारवाई होत नाही हे यांच्या चांगल्या पचनी पडले आहे. काही दिवसांपूर्वीच राधिका रस्त्यावर असलेल्या वाईन शॉपसमोर एका मद्यपीने युवतीची छेड काढल्याची घटना घडली होती. पुन्हा अशीच घटना घडण्याची वाट पाहिली जात असल्याची चर्चा सुरु आहे.
सातारा पोलिसांना पेट्रोलिंगसाठी नवी वाहने देण्यात आली आहेत. परंतु, ही वाहने पेट्रोलिंगला कमी आणि बंदोबस्तासाठी जास्त वापरण्यात येत आहेत. यामुळे शहरात पेट्रोलिंग जवळपास बंद झाल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
शालेय विद्यार्थीही वाहने घेऊन रस्त्यावर
शहरातील मराठीसह इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारे नववी व दहावीचे विद्यार्थी स्कूटी, यामाह, बुलेट अशी वाहने घेऊन शाळेत येत आहेत. शाळा सुटल्यावर परिसरात वाहने वेगाने चालवून अपघातजन्य परिस्थिती निर्माण करत आहेत. यांच्यावर शाळा प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्याचा मनमानी कारभार सुरु आहे. पालकांकडून मुलांना सवलत देण्यात येत आहे. अलपवयीन मुलाने वाहन चालविले तर पालकावरही कारवाई होणे अपेक्षितअसते. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकही मोठअया कौतुकाने आपल्या पाल्याला दुचाकी वाहन चालविण्यास देत आहे.





