Remo D’Souza : गँगस्टर ‘रवी पुजारी’ला अटक; रेमो डिसोझाचं नाव आलं समोर, नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी पुजारीला या प्रकरणात ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Ravi Pujari । Remo D’Souza – बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसोझा यांच्याकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला अटक केली आहे. २०१८ मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी पुजारीला या प्रकरणात ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
२०१८ मध्ये रेमो डिसोझा यांना रवी पुजारीच्या नावाने धमकीचे फोन आले होते. एका व्यावसायिक वादातून पुजारीने रेमो यांच्याकडे ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.
पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याप्रकरणी ठाणे आणि मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. रवी पुजारीला २०२० मध्ये सेनेगलमधून भारतात आणले गेले होते. तेव्हापासून तो विविध गुन्ह्यांसाठी कोठडीत आहे.
पुजारीवर अनेक खंडणी आणि हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे दाखल आहेत. रेमो डिसोझा प्रकरणातील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने त्याचा ताबा मिळवला आहे. व्यावसायिक कनेक्शन: असे म्हटले जाते की, एका व्यापा-याने रेमो डिसोझा यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता आणि त्या व्यापा-यानेच पुजारीला रेमो यांना धमकावण्यासाठी सुपारी दिली होती.






