-->

51 गुन्हे दाखल असलेल्या रवी पुजारीला नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या न्यायालयाने कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी याला नऊ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फेब्रुवारी 2020 मध्ये पुजारीला भारताकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. मात्र, तपासासाठी त्याला सुरवातीला सर्वाधिक गुन्हे दाखल असणाऱ्या कर्नाटकमध्ये आणण्यात आले. 

विलेपार्ले येथील गजली हॉटेलमध्ये 22 ऑक्‍टोबर 2016 ला केलेल्या गोळीबार प्रकरणात त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यास न्यायलयाने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती.

या हॉटेलच्या मालकाच्या दिशेने गोळीबार करून पुजारीच्या गुंडांनी त्याला पुजारीचा फोन नंबर दिला होता. त्याला फोन न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पुजारीवर मुंबई पोलिसांत 51 गुन्हे दाखल असून त्यापैकी 20 गुन्ह्यांत त्याला मोक्का लावण्यात आला आहे.

पुजारीवर देशभरात किमान 200 गुन्हे दाखल आहेत. त्याला जानेवारी 2019 मध्ये पश्‍चिम अफ्रिकेत अटक करण्यात आली. त्यात जामीन मिळाल्यानंतर तो द. अफ्रिकेत पळून गेला. अंमली पदार्थांची तस्करी आणि खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

तेथे अँथोनी फर्नांडिस या नावाने रहात असे. त्याच्याकडे बुर्कानिया पासो या देशाचा पासपोर्ट होता. त्याला सेनेगलची राजधानी डकर येथून अटक करण्यात आल्याची माहिती गुप्तचर खात्याच्या सूत्रांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.