Ganeshotsav 2026: गणेशमूर्ती विक्रेत्यांना महापालिकेचा मोठा दिलासा! शहरात २३ ठिकाणी उभारणार ३०८ स्टॉल्स
Ganeshotsav 2026: बालेवाडी, कोथरूड, हडपसर ते लोहगाव-खराडीपर्यंत २३ ठिकाणी जागा निश्चित; पोलीस व इतर कायदेशीर परवानग्या घेणे विक्रेत्यांसाठी अनिवार्य.

Ganeshotsav 2026 – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विक्रेत्यांना पालिकेने दिलासा दिला असून, शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत २३ जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या जागांवर तब्बल ३०८ तात्पुरते स्टॉल उभारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्ते व पदपथांवर गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यास मनाई करण्यात आली असून, पालिकेच्या मोकळ्या, बांधिव जागा, मैदाने व पटांगणांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाने क्षेत्रीय कार्यालयनिहाय जागा निश्चित केल्या आहेत. बालेवाडी येथे १०, कोंढवा येथे ५, हडपसर-मुंढवा परिसरातील दोन ठिकाणी ३५ व ५, धानोरीतील दोन ठिकाणी ३०, तर कोथरूड-बावधन परिसरातील तीन ठिकाणी ४० स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्वती येथे ५, कात्रज येथे २५, बिबवेवाडी येथे १५, धायरी येथे ५, वडगाव येथे ३० ,
तर लोहगाव-खराडी परिसरातील ठिकाणी ६५ स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. वारजे-कर्वेनगरमधील चार ठिकाणी २५ , तर घोले रोड परिसरातील तीन ठिकाणी २५ स्टॉलची व्यवस्था केली आहे. स्टॉलसाठी १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून, पात्र अर्जदारांना विहित १० दिवसांचे भाडे तसेच सफाई शुल्कही भरावे लागणार आहे.
स्टॉल उभारणीचा कालावधी ५ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे. तर, स्टॉलचे तात्पुरते बांधकाम करणे, तसेच पोलीस व इतर आवश्यक कायदेशीर परवानग्या घेण्याची जबाबदारी संबंधित विक्रेत्यांची राहणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण टाळण्यासाठी महापालिकेने ही पर्यायी व्यवस्था केली आहे.





