Pune : गणेशमूर्तीदान केलेल्या भाविकांना सेंद्रिय खताचे वाटप; पुणेकरांचा उपक्रमाला मोठा प्रतिसाद

पुणे : शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत महापालिकेला गणेशमूर्ती दान करणाऱ्या भाविकांसाठी भूमिग्रीन एनर्जी एनवायरो केअर एलएलपीतर्फे मोफत सेंद्रिय खताचे वाटप करण्यात आले.
कंपनीकडून उरुळी देवाची येथील महापालिकेच्या वर्षानुवर्षे साठून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यातून ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून दर्जेदार सेंद्रिय खत तयार केले जाते. पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणून कंपनी दरवर्षी या उपक्रमात सहभागी होत असते.
महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून शहरातील नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणेकरांकडून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, यंदा तब्बल १ लाख ७२ हजार गणेशमूर्ती दान करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर कंपनीतर्फे शहरातील अनेक विसर्जन घाटांवर गणेशमूर्तीदान करणाऱ्या भाविकांना भेट म्हणून सुमारे १५ हजार किलो सेंद्रिय खत वाटण्यात आले. प्रत्येक पिशवीत तीन किलो खत असून, तब्बल साडेपाच हजार पिशव्या वाटप झाल्या. हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही यशस्वीपणे राबविण्यात आल्याचे कंपनीचे संचालक पंकज पासलकर, विजय टिळेकर आणि कमलेश सिंग यांनी सांगितले.





