Ganeshotsav 2026: बाप्पाच्या स्वागतासाठी बोहरीआळी फुलली! रेडीमेड अन् थीमबेस्ड मखरांना गणेशभक्तांची पसंती
Ganeshotsav 2026: ‘अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो यः सुरासुरैः | सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ||’ अशा या गणरायाचे आगमन होण्याला अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.

Ganeshotsav 2026 – ‘अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो यः सुरासुरैः | सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ||’ अशा या गणरायाचे आगमन होण्याला अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी घरोघरी जय्यत तयारी सुरू असून, सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलून निघाल्या आहेत. अर्थात या साहित्य खरेदीसाठी भाविकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे.
बाप्पांना विराजमान करण्यासाठी मखरांची खास मागणी मोठ्याप्रमाणात दिसून येते. वेगवेगळ्या प्रकारचे मखर यानिमित्ताने पाहायला मिळत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बोहरीआळीमध्ये मखरांच्या सजावटीच्या साहित्याची व्हरायटी पाहायला मिळते. तयार मखरांपासून ते राॅ मटेरियल विक्रीसाठी आले आहे. एमडीएफ वापरून विठ्ठल, स्वामी समर्थ यांपासून ते शिवाजी महाराज, वृक्ष, विविध डिझाइनच्या कमानी विक्रीसाठी आल्या आहेत.
त्यामध्ये हवा तो रंग लावून, सजवून या गोष्टी घरात करण्यात येणाऱ्या सजावटीमध्ये वापरता येतात. याशिवाय गणपतीसमोर थीम बेस्ड सजावट करायचे असेल तर वारी, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांच्या लढाईचा प्रसंग असे एमडीएफमध्येच रंगीत चित्रही याठिकाणी विक्रीसाठी आले आहेत. अगदी ‘रेडी टू युज’ या प्रकारची तयार मखरे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
त्यामध्ये आकर्षक सजावट तर आहेच शिवाय लायटिंगही करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना सजावटीसाठी वेळ नाही, अशांना हे उत्तम उपयोगी आहे. त्यामुळे अशा मखरांना मोठ्याप्रमाणात मागणी आहे. याच्या किमती पाचशे रुपयांपासून ते साडेचार हजार रुपयांपर्यंत आहेत. यंदाच्या वर्षी थर्माकोलला फाटा देऊन फोमचा वापर करून ही मखरे तयार करण्यात आली आहेत. जाड पुठ्ठा आणि फोम याचा वापर थर्माकोलऐवजी केल्याचे दिसून आले आहे.
आकर्षक सॅटिन कापडांवर भर
आकर्षक सॅटिन कापडांवर सध्या सजावटीमध्ये अनेकांनी भर दिला आहे. रंगबिरंगी, टिकल्या आणि आरसे लावलेले सॅटिन कापड बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. याचा वापर गणपतीच्या मंडपाला लावण्यात येणाऱ्या पडद्यांसाठी तसेच गणपतीला आसन म्हणून उपयोगी आहे. पथारी व्यावसायिकांनी या गोष्टी विक्रीला काढल्या आहेत.
प्लास्टिकची फुले मात्र आहेतच
गेल्या काही वर्षांपासून, गणेशोत्सवकाळात प्लास्टिकच्या फुलांचा वापर केला जाऊ नये यासाठी मोठ्याप्रमाणात चळवळ उभी केली जात आहे. मात्र, दरवर्षी या मागणीला फाटा दिला जातो. यंदाही या सजावटीत प्लास्टिक फुले, पाने यांच्या माळा, वेली दिसून येत आहेत. सजावटीमध्ये बहुतांश याच गोष्टींचा वापर केला जात असल्याचे बाजारपेठेतील या साहित्याच्या उपस्थितीतून दिसून येते.






