River Pollution: कृष्णा नदीच्या पुरामुळे पर्यावरणाचा भयानक चेहरा समोर; उडतरेमध्ये प्लास्टिक अन् थर्माकोलचा खच
River Pollution: खडकी आणि उडतरे परिसरात कृष्णा नदीकाठी साचला मानवनिर्मित कचरा; शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणावर गंभीर संकट.

River Pollution – खडकी येथील कृष्णा नदीला आलेल्या पुरानंतर एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नदीच्या प्रवाहातून वाहून आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोल, पाण्याच्या बाटल्या आणि विविध प्रकारच्या मानवनिर्मित कचर्याचा मोठा ढिग नदीकाठी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नदी, ओढे आणि नाल्यांमध्ये प्लास्टिक व इतर कचरा टाकल्यामुळे जलप्रदूषण वाढत असून जलचरांचे जीवनही धोक्यात येत आहे.
पर्यावरणप्रेमींच्या मते प्लास्टिक कचरा नदीत टाकण्याची प्रवृत्ती थांबवण्यासाठी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित प्रशासनाने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. नदीकाठ स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम, कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसाळ्यात नदीत वाहून जाणारा हा कचरा शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरणासाठी गंभीर संकट निर्माण करू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नदी ही कचरा टाकण्याची जागा नसून जीवनदायिनी आहे, याची जाणीव ठेवून तिचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
“माणसाने नदीच्या पोटात टाकलेली घाण, निसर्गाने पुराच्या रूपाने पुन्हा माणसासमोर आणून ठेवली. हा केवळ कचर्याचा ढीग नाही, तर पर्यावरणाबाबतच्या आपल्या निष्काळजीपणाचा आरसा आहे.”
– मनोज दादासाहेब शिंगटे पाटील, पर्यावरण रक्षक.





