Ganesh Divekar : शेतकऱ्याच्या मुलाची गगन भरारी; वरवंड येथील गणेश दिवेकरची फौजदारपदाला गवसणी

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड येथील शेतकरी कुटुंबातील गणेश अंकुश दिवेकर या विवाहीत तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करून फौजदारपदाला गवसणी घातली आहे. कुटुंबाबरोबर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या गणेशचा ग्रामस्थांच्या वतीने जंगी सन्मान करण्यात आला असून तालुक्यात त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच वडील अंकुश व आई लक्ष्मी दिवेकर यांनी पेढा भरवून गणेशचे अभिनंदन केले.
वरवंड येथील जनाईमळा वस्तीवरील अंकुश व लक्ष्मी दिवेकर या दांपत्याचा गणेश मुलगा आहे. गणेशच्या मनात शालेय जीवनापासून पोलिस वर्दीविषयी कुतूहल होते. तसेच आई वडिलांनाही मुलगा पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. घरची परिस्थिती बेताची असताना त्यांनी गणेशला चांगले शिक्षण दिले. गणेशने वरवंड येथील ग्रामशिक्षण संस्थेचे श्री गोपीनाथ विद्यालयात इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण घेतले.
आई वडिलांप्रमाणे पत्नीची साथ
त्यानंतर त्याने माळेगाव-बारामती येथे व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमाची पदवी व पदविकाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने मनात असणाऱ्या फौजदार पदासाठी लक्ष केंद्रित केले. या दरम्यान गणेशचे अंकिता हिव्याशी विवाह झाला. आई वडिलांप्रमाणे पत्नीची साथ मिळाली. त्याने एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासाकडे वाटचाल करीत रात्रंदिवस कठोर परीश्रम घेतले. २०१७-१८ तसेच २०१९-२० व २१ साली एमपीएससीच्या माध्यमातून फौजदारपदाची परीक्षा दिली. मात्र, यशाने गुंगारा दिला. अपयशासमोर पराभूत न होता, जिवाचे रान करून व जिद्द उराशी बाळगून पुन्हा परीक्षेची जोरदार तयारी केली.
अन गणेशची अखेर स्वप्नपूर्ती झाली
अखेर २०२३ साली झालेल्या एमपीएससी परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. अन गणेशची अखेर स्वप्नपूर्ती झाली. गणेशला २७८ गुण मिळाले. निकाल जाहीर होताच आई-वडील व पत्नीचा आनंद गगनात मावत नव्हता. कुटुंबाबरोबर संपूर्ण गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या गणेशची गुलालाची उधळण करून गावातून जंगी मिरवणूक काढली.





