Pune : एमपीएससी पेपरफुटीप्रकरणी केवळ निलंबन नको तर कठोर शिक्षा व्हावी : विश्वजीत कदम
Pune : MPSC पेपरफुटीप्रकरणी दोषींना केवळ निलंबन न करता कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आमदार विश्वजीत कदम यांनी केली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत चौकशी पारदर्शक करण्याची मागणी केली.

Pune : एमपीएससीच्या पेपरफुटी विरोधात केलेले आंदोलन ही केवळ विद्यार्थ्यांची लढाई नसून महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. या आंदोलनाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला आणि भ्रष्ट राजकारणाला हादरवून टाकले आहे. याविषयी नेमलेल्या चौकशी समितीकडून अतिशय पारदर्शक अहवाल येणे अपेक्षित आहे.
पेपरफुटी प्रकरणात जे दोषी आहेत त्यांचे केवळ निलंबनच नव्हे तर कायद्यानुसार त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा होणे अपेक्षित असून ज्या योगे भविष्यात कोणीही पेपरफुटीचे पाप करण्याचे धाडस करणार नाही. या लढ्याला यश येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहीन, अशी ग्वाही माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम यांनी दिली.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत खंबीरपणे लढणारे आमदार विश्र्वजीत कदम यांचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आज (दि. २६) सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार कदम बोलत होते. इंदूलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वप्नील भिसे, अमोल साळवे, धनंयज निकम, प्रवीण गावडे, साहेबराव क्षीरसागर, रविराज कांबळे, अजय जगताप, अनिकेत देशमाने, प्रवीण पाटील, गोकुळ बेलेपाटील यांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनात पुढाकर असलेले ऋषिकेश गांगुर्डे, विवेकानंद पाटील उपस्थित होते.
विश्वजीत कदम पुढे म्हणाले, पेपरफुटी ही कुठल्या एका व्यक्तीमुळे होत नसते तर ती एक संपूर्ण यंत्रणा असते. या यंत्रणेचा छडा लागणे गरजेचे असून या आंदोलनातून महाराष्ट्राला एक संदेश दिला पाहिजे की, वर्तमानातच नव्हे तर भविष्य काळातही पेपरफुटीचा विचार देखील कोणाच्या डोक्यात येऊ नये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात येऊन अतिशय गरीबीची पार्श्वभूमी असतानाही सोळा-सोळा तास अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकरांचा हा संघर्ष कौतुकास्पद आहे.
हे केवळ विद्यार्थी नसून महाराष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. एमपीएससीच्या पेपरफुटीमुळे आणि काही लोकांच्या भ्रष्ट कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या कष्टाची विटंबना होत असून अयोग्य व्यक्ती पदांवर बसत आहेत. या प्रकारामुळेच विद्यार्थ्यांचा केवळ अपेक्षाभंगच होत नाही तर त्यांच्यात निर्माण होणार संताप पूर्णपणे स्वाभाविक आहे. एवढे मोठे पाप करणाऱ्या यंत्रणेला पाठीशी न घालता तिचा बिमोड करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून उभे राहिलेले हे आंदोलन फक्त रस्त्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील घराघरापर्यंत नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचले आहे.
पुरावे शोधण्याचे आवाहन…
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून विश्वजीत कदम म्हणाले, विद्यार्थ्यांनी गटागटाने संपूर्ण महाराष्ट्रात फिरून पेपरफुटीसंदर्भातील आणखी काही पुरावे शोधून ते चौकशी समितीला द्यावेत. या प्रक्रियेसाठी आपला संपूर्ण पाठींबा असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सरकारने जनतेशी बांधिल राहून या प्रकरणाची चौकशी होत असताना कुठलाही अडथळा आणू नये. चौकशी अहवाल योग्य वाटल्यास तो निश्चितपणे मान्य केला जाईल. परंतु अयोग्य वाटल्यास शासनाला हेही सांगू की, यात पुन्हा दुरुस्ती करून चौकशी पुढे नेणे आवश्यक आहे. त्या करिता पुन्हा रस्त्यावर उतरून लढाई करावी लागल्यास मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.





