Rohit Pawar: ‘विजय एकजुटीचा, जिद्दीचा आणि चिकाटीचा…! MPSC विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर रोहित पवारांची पोस्ट
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात हे आंदोलन सुरू होते

Rohit Pawar: मागील 11 दिवसांपासून पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. मध्यरात्री (12 ऑक्टोबर 2026) रोजी अखेर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी चर्चेनंतर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे.
तसेच MPSC प्रकरणाच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबतची भूमिका स्पष्ट केली.
तुकाराम मुंढे समितीचे सचिव म्हणून काम पाहणार
या समितीच्या अध्यक्षपदासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप भोसले यांच्या नावाची नियुक्ती करण्यात येणार आहे. समितीमध्ये माजी न्यायाधीश न्या. पी. डी. नाईक, प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे, सेवानिवृत्त सचिव गणेश पाटील आणि पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम यांचा समावेश असेल. तुकाराम मुंढे समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. एमपीएससीच्या कामकाजात पारदर्शकता आणणे, परीक्षा प्रक्रियेतील अडचणींचा अभ्यास करणे आणि आवश्यक सुधारणांबाबत शिफारशी करणे, यासाठी ही समिती काम करणार आहे.
#MPSC विद्यार्थी सत्याग्रहाचा अखेर विजय…!✌🏻🥳
विजय एकजुटीचा, जिद्दीचा.. आणि चिकाटीचा…!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSC #विद्यार्थी_एकजूट #विजय_एकजुटीचा https://t.co/27N29WfeAM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 11, 2026
MPSC विद्यार्थांच्या मागण्यासाठी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार देखील आंदोलनस्थळी 11 दिवस उपस्थित असे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात हे आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी शिवेंद्रराजे यांनी रोहित पवार आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. या चर्चेनंतर सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून, सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचा मसुदा शिवेंद्रराजे यांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे दिला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
MPSC विद्यार्थी सत्याग्रहाचा अखेर विजय…!
आंदोलनाला मिळालेल्या या यशानंतर विद्यार्थांनी थेट रोहित पवारांना खांद्यावर घेऊन केला जल्लोष साजरा केला. या आनंदोत्सवाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला आहे. ‘MPSC विद्यार्थी सत्याग्रहाचा अखेर विजय…! विजय एकजुटीचा, जिद्दीचा.. आणि चिकाटीचा…!’ असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे.
भीमनवार प्रतिक्रिया
दुसरीकडे, एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल. जयहिंद…जय महाराष्ट्र…., ” असे भीमनवार यांनी म्हंटले आहे.
Navratri festival: यंदाच्या नवरात्रोत्सवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; अनेकांनी घेतली एआयची मदत





