Pune District : तीन गावांतील मंदिर सभामंडपांसाठी ३० लाखांचा निधी
Pune District : कामांच्या प्रशासकीय मान्यतापत्रांचे वितरण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर आणि आंबेठाण स्मार्ट व्हिलेजचे माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर यांच्या उपस्थितीत संबंधित गावांतील विकास सोसायट्यांचे संचालक व ग्रामस्थांना करण्यात आले.

आंबेठाण :जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अ वर्ग सोसायटी मतदारसंघातील संचालकांनी केलेल्या मागणीनुसार कुरकुंडी, कोये आणि पिंपरी बुद्रुक या तीन गावांतील विकासकामांसाठी जिल्हा परिषद निधीतून एकूण ३० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पहिल्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुनीता शरद बुट्टे-पाटील यांनी या मागण्यांचा पाठपुरावा केला.
या निधीतून कुरकुंडी येथील मुकाई देवी मंदिर सभामंडपासाठी १० लाख रुपये, पिंपरी बुद्रुकमधील लादवड येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर सभामंडपासाठी १० लाख रुपये, तर कोये येथील मंदिर सभामंडप व बहुउद्देशीय इमारतीच्या कामासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामांच्या प्रशासकीय मान्यतापत्रांचे वितरण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश राक्षे, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर आणि आंबेठाण स्मार्ट व्हिलेजचे माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर यांच्या उपस्थितीत संबंधित गावांतील विकास सोसायट्यांचे संचालक व ग्रामस्थांना करण्यात आले.
कोये येथे बहुउद्देशीय इमारतीचे मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या कामासाठी शरद बुट्टे-पाटील यांनी यापूर्वी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून काम प्रगतीपथावर आहे. आता नव्याने मंजूर झालेल्या १० लाख रुपयांमुळे कामाला आणखी चालना मिळणार आहे. निधी तातडीने मंजूर झाल्याबद्दल कोये विकास सोसायटीच्या प्रतिनिधी जयश्री रमेशशेठ राळे, कुरकुंडी विकास सोसायटीचे प्रतिनिधी तथा सरपंच नितीन चिंधू भोकसे आणि पिंपरी बुद्रुक विकास सोसायटीचे प्रतिनिधी मछिंद्र भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. या तिन्ही गावांतील सभामंडपांच्या उर्वरित कामांसाठीही प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी ग्रामस्थांना दिली.





