Baramati : बारामती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी शिर्के बिनविरोध
Baramati : बारामती सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पूर्ण झाली. बँकेचे अध्यक्ष ॲड. शिरीष कुलकर्णी, संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ आणि अधिकारी-कर्मचारी यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष देवेंद्र शिर्के यांचे अभिनंदन केले.

बारामती : दि बारामती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी देवेंद्र रामचंद्र शिर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गुरुवार, दि. २२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्षपदाचा नुपूर आदेशकुमार शहा यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शिर्के यांची निवड करण्यात आली.
बारामती सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पूर्ण झाली. बँकेचे अध्यक्ष ॲड. शिरीष कुलकर्णी, संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ आणि अधिकारी-कर्मचारी यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष देवेंद्र शिर्के यांचे अभिनंदन केले. या वेळी शिर्के यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, बँकेचे अध्यक्ष ॲड. शिरीष कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक प्रीतम पहाडे तसेच सर्व सहकारी संचालक आणि व्यवस्थापन मंडळातील सदस्यांचे आभार मानले.
६५ वर्षांच्या प्रवासात बँकेची आर्थिक भरारी
दि बारामती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात ६५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून, विश्वास, पारदर्शकता आणि आर्थिक शिस्तीच्या बळावर बँकेने प्रगती साधली आहे. बँकेच्या माहितीनुसार, सध्या बँकेच्या एकूण ठेवी सुमारे २,१६० कोटी रुपये, तर कर्जवाटप १,३७९ कोटी रुपये आहे. बँकेचे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे (नेट एनपीए) प्रमाण शून्य टक्के असून, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये बँकेच्या ३६ शाखा आणि एका विस्तारित कक्षाच्या माध्यमातून ग्राहकांना बँकिंग सेवा पुरविल्या जातात. अवघ्या २० हजार ४०० रुपयांच्या प्रारंभिक भागभांडवलावर सुरू झालेल्या बँकेचे भागभांडवल आज ५८.५९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बदलत्या बँकिंग व्यवस्थेत ग्राहकांना सुरक्षित, आधुनिक आणि गतिमान सेवा देणे, व्यवसायवृद्धीला चालना देणे तसेच आर्थिक शिस्त कायम राखणे यावर बँकेचा भर असल्याचे सांगण्यात आले. नवनिर्वाचित उपाध्यक्ष शिर्के यांच्या निवडीमुळे बँकेच्या व्यवस्थापनाला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी बँकेचे तज्ज्ञ संचालक प्रीतम पहाडे (सीए), संचालक सचिन सातव, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष उद्धव गावडे, संचालक रोहित घनवट, किशोर मेहता, विजयराव गालिंदे, नुपूर शहा, नामदेवराव तुपे, जयंत किकले, रणजित धुमाळ, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, तज्ज्ञ संचालक व व्यवस्थापन मंडळ सदस्य ॲड. रमेश गानबोटे, शांताराम भालेराव, डॉ. अमोल गोजे, ओंकार देवळे, कार्यकारी संचालक विनोद रावळ, मुख्य सरव्यवस्थापक सोमेश्वर पवार, सरव्यवस्थापक विजय जाधव, सहायक सरव्यवस्थापक प्रशांत शिर्के यांच्यासह मुख्यालयातील अधिकारी उपस्थित होते.
ठळक चौकट :
बँकेची आर्थिक स्थिती
एकूण ठेवी : २,१६० कोटी रुपये
एकूण कर्जवाटप : १,३७९ कोटी रुपये
निव्वळ एनपीए : ० टक्के
सभासदांना लाभांश : १० टक्के (२०२५-२६)
एकूण शाखा : ३६
विस्तारित कक्ष : १
भागभांडवल : ५८.५९ कोटी रुपये
कार्यक्षेत्र : सहा जिल्हे





