Pune District : दादांच्या स्मृतींना साहित्य, रंगभूमीचा स्वरमय मुजरा
Pune District : विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण सहभागी होणार आहेत, तर शारदानगर येथे प्राचार्य राजकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत ‘रंग जगण्याचा’ या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

बारामती : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शताब्दी साहित्य संमेलनानिमित्त बारामती शाखेच्या वतीने बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकांकिका सादरीकरण, साहित्यिक परिसंवाद, प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी संवाद आणि ‘आठवणीतील अजितदादा : लब्जों का सफर’ या श्रद्धांजलीपर संगीत कार्यक्रमाचा समावेश आहे. लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या उपक्रमांची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे किरण गुजर यांनी दिली.
बुधवारी सकाळी १०.३० वाजता तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शारदानगर येथील पी.जी.आर.सी. सेंटर या तीन ठिकाणी एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील कार्यक्रमाला नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, लेखक, दिग्दर्शक व नाट्यसमीक्षक राज काझी उपस्थित राहणार आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण सहभागी होणार आहेत, तर शारदानगर येथे प्राचार्य राजकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत ‘रंग जगण्याचा’ या एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.
दुपारी ४ वाजता डॉ. अप्पासाहेब पवार सभागृहात ‘एकांकिका लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय’ या विषयावर साहित्यिक परिसंवाद होईल. यामध्ये योगेश सोमण, राज काझी, ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते श्रीष देशपांडे आणि नाट्यदिग्दर्शक व अभिनेते विवेक पांडकर सहभागी होणार आहेत. एकांकिका लेखनातील आशयघनता, दिग्दर्शनातील सर्जनशीलता, अभिनयाची अभिव्यक्ती आणि मराठी रंगभूमीसमोरील आव्हानांवर यावेळी विचारमंथन होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता याच सभागृहात प्रसिद्ध अभिनेते, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याशी विशेष संवाद आयोजित करण्यात आला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचा प्रवास, लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि साहित्याचा समाजजीवनाशी असलेला संबंध याविषयी या संवादातून विविध पैलू उलगडले जाणार आहेत. यावेळी राज काझी आणि योगेश सोमण उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत तिरंगा सर्कल परिसरातील नटराज नाट्य कला मंदिरात ‘आठवणीतील अजितदादा : लब्जों का सफर’ हा श्रद्धांजलीपर संगीत कार्यक्रम होणार आहे.
गीतांच्या माध्यमातून अभिवादन
गझल, सूफी आणि कव्वाली गीतांच्या माध्यमातून अजितदादांच्या स्मृतींना स्वरमय अभिवादन केले जाणार आहे. गायिका तेजस्विनी पाहुजा, गायक आशिष देशमुख आणि आकाश सोळंकी सादरीकरण करणार आहेत. मुकेश दैडिया वाद्यवृंदाचे संचालन करणार असून, रशीद शेख, अपूर्व द्रविड आणि नंदू डेव्हिड वाद्यसाथ करणार आहेत. साहित्य, रंगभूमी आणि संगीताच्या माध्यमातून अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या उपक्रमांमध्ये साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, लेखक, नाट्यकलावंत आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन किरण गुजर यांनी केले आहे.





