Atishi Marlena : “भाजपकडून काँग्रेसला फंडिंग…”; दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा सनसनाटी आरोप

Atishi Marlena : दिल्लीत भाजप आणि काँग्रेसचे साटंलोटं असून, निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून काँग्रेसला फंडिंग होत असल्याचा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केला आहे. यामुळे देशाच्या राजकारणातच खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आतिशी म्हणाल्या, दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून काँग्रेसला आर्थिक रसद पुरवली जात आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपकडून पैसे मिळाले आहेत. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची मतांचे विभाजन घडवण्याच्या योजनेवर काँग्रेसचे नेते काम करत आहेत.
काँग्रेस पक्षाने अरविंद केजरीवाल आणि माझ्याविरोधात एफआयआर नोंदवली. मात्र आम्ही कुठलीही एफआयआर आजपर्यंत नोंदवलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवारांचा खर्च हा भाजपाकडून केला जात असल्याची माहिती आम्हाला अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. यामध्ये संदीप दीक्षित आणि फरहाद सुरी हे प्रमुख आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याकडून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत प्रचार का करवून घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.





