Top 10 News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ते भररस्त्यात खासदाराला मारहाण..; वाचा आजच्या टॉप १० बातम्या
Top 10 News : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ते भररस्त्यात खासदाराला मारहाण..; वाचा आजच्या टॉप १० बातम्या

Top 10 News : १) शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 10 दिवसांत कर्जमाफी होणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलीय. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी येत्या 10 दिवसांत शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा केलीय. राज्य सरकारने 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. यासाठी तब्बल 36 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. तसेच तरुण आणि मेंढपाळ समाजासाठीही नव्या कल्याणकारी योजना आणण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. (Top 10 News)
२) हिंगोलीत पुन्हा भूकंपाचे धक्के; गूढ आवाजाने नागरिकांमध्ये भीती
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास जमीन थरथरल्याचा अनुभव ग्रामस्थांनी सांगितला. याचवेळी जमिनीतून गूढ आवाज आल्याचा दावाही स्थानिकांनी केला आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जमा झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यांबाबत स्थानिक प्रशासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नसला तरी माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Top 10 News)
३) पुण्यातील IT कंपनी रातोरात बंद, 700 हून अधिक इंजिनिअर्स बेरोजगार
पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंजवडी फेज-2 येथील Think Technology India या कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालय बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे 700 हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आणि फ्रेशर्स अचानक बेरोजगार झाले आहेत. कंपनी गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवत असल्याची माहिती समोर आली असून दिलेले काही धनादेशही बाऊन्स झाल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. तसेच नोकरीदरम्यान लॅपटॉपसाठी घेतलेली प्रत्येकी 15 हजार रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट रक्कमही परत न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ऐन आर्थिक मंदीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे पुण्याच्या आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रभावित कर्मचाऱ्यांनी न्यायाची मागणी केली आहे. (Top 10 News)
४) लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ई-केवायसी दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल रोजी संपल्यानंतर तब्बल 80 लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला या योजनेत 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या, मात्र पडताळणीनंतर पात्र महिलांची संख्या 1 कोटी 66 लाखांवर आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे, तसेच इतर निकषांची पूर्तता करणे या अटींची पडताळणी करण्यात आली. अनेक महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने किंवा चुकीची माहिती दिल्याने त्यांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, मे महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच जमा होण्याची अपेक्षा असून सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. (Top 10 News)
५) धावत्या रेल्वेत गोंडस बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-बाळ सुरक्षित
मुंबईहून डिब्रूगढकडे जाणाऱ्या एलटीटी-डिब्रूगढ एक्सप्रेसमध्ये एक आनंददायी घटना घडलीय. भुसावळ आणि इटारसी दरम्यान प्रवास करत असताना गर्भवती ज्योती चौधरी यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत ट्रेन कंडक्टर आणि टीटीईसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. डब्यातील महिला प्रवाशांच्या सहकार्याने बी-6 कोचमध्ये सुरक्षित व्यवस्था करण्यात आली. अखेर सायंकाळी सुमारे 5.40 वाजता धावत्या रेल्वेतच महिलेची यशस्वी प्रसूती झाली आणि तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला. हरदा स्थानकावर वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले होते. तेथे पोहोचल्यानंतर आई आणि नवजात बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Top 10 News)
६) पश्चिम बंगालमध्ये भररस्त्यात खासदाराला मारहाण
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतरही राजकीय संघर्ष सुरूच असून शनिवारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी आणि टमाटे फेकून हल्ला झाल्यानंतर वातावरण आणखी तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि अटक करण्यात आलेल्या टीएमसी कार्यकर्त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी खासदार कल्याण बॅनर्जी चंडीताला पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की व राडा झाला. गोंधळादरम्यान कल्याण बॅनर्जी यांच्यावर चेंडू आणि दगडासारख्या वस्तू फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. (Top 10 News)
७) आता घरबसल्या फक्त 15 रुपयांमध्ये काढा सातबारा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सातबारा उतारा काढण्यासाठी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या महाभूलेखच्या डिजिटल सातबारा पोर्टलवरून घरबसल्या अवघ्या 15 रुपयांत 7/12 उतारा डाउनलोड करता येणार आहे. यासाठी सर्वप्रथम डिजिटल सातबारा पोर्टलवर जाऊन नवीन नोंदणी करावी लागेल. नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी भरून यूजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर लॉगिन करून जिल्हा, तालुका, गाव आणि सर्व्हे किंवा गट क्रमांकाची माहिती भरून सातबारा डाउनलोड करता येईल. ऑनलाइन मिळालेला हा डिजिटल सातबारा आणि 8-अ उतारा सर्व शासकीय कामांसाठी वैध मानला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हीची मोठी बचत होणार आहे. (Top 10 News)
८) इराणला ट्रम्प यांची थेट धमकी; ‘अटी मान्य नाही केल्या तर लष्करी कारवाई करू’
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींवर मोठे विधान करत तणाव पुन्हा वाढवला आहे. अमेरिका इराणसोबत चांगला करार करण्यास इच्छुक असल्याचे सांगतानाच, कोणतीही घाई केली जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मात्र, इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत तर लष्करी कारवाईचा पर्याय खुला असल्याची थेट चेतावणी त्यांनी दिली. ट्रम्प म्हणाले, योग्य करारामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात, परंतु वाटाघाटी अपयशी ठरल्यास अमेरिका दुसरा मार्ग स्वीकारेल. त्यांनी इराणच्या नेतृत्वावर कठोर टीका करत आण्विक कार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, इराणच्या क्षमतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वी केलेल्या कारवायांचा उल्लेख करत अमेरिकेची भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे अमेरिका-इराण संबंधांतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Top 10 News)
९) ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; आठवड्याभरात केली बक्कळ कमाई
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा बहुप्रतिक्षित सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट दृश्यम 3 बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 15.85 कोटी रुपयांची कमाई करत शानदार सुरुवात केली. आठवड्याच्या मध्यात कमाईत किंचित घट झाली असली तरी वीकेंडला चित्रपटाने पुन्हा वेग पकडला. आतापर्यंत ‘दृश्यम 3’ने 91.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. भूत बंगला, राजा शिवाजी, करुप्पू आणि पति, पत्नी और वो 2 यांसारख्या चित्रपटांशी स्पर्धा असूनही ‘दृश्यम 3’ने प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे.
१०) आयपीएलच्या विजेत्याला यंदा किती कोटी मिळणार? प्राइज मनीचे आकडे समोर!
आयपीएल २०२६ चा महाअंतिम सामना आज आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी आयपीएलच्या बक्षीस रकमेचे सर्व आकडे समोर आले आहेत. बीसीसीआयकडून यंदा प्राइज मनीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यंदाही विजेत्या संघाला तब्बल २० कोटी रुपयांचे बंपर इनाम मिळणार आहे, तर उपविजेत्यासंघाला १२.५ ते १३ कोटी रुपये दिले जातील. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावरील संघाला ७ कोटी आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला ६.५ कोटी रुपये मिळतात. तसेच ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी १० लाख रुपये मिळतील.




