Top 10 News : तलाठी भरती जाहीर ते परभणीत बोकड देतोय दूध..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : तलाठी भरती जाहीर ते परभणीत बोकड देतोय दूध..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : 1) अखेर तलाठी भरती जाहीर; MPSC कडून 5,707 पदांसाठी जाहिरात
राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत एकूण ५,७०७ पदांसाठी भरती जाहीर केलीय. यामध्ये १,५३९ ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांचा समावेश असून लिपिक-टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आदी पदांचाही समावेश आहे. तलाठी पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट २०२६, तर परीक्षा शुल्क भरण्याची मुदत ८ ऑगस्ट २०२६ आहे. गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर २०२६ रोजी ऑफलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांना MPSCच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. (Top 10 News)
2) परभणीत बोकड देतोय दूध; तज्ज्ञांनी सांगितलं दुर्मिळ कारण
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात एक दुर्मिळ घटना समोर आलीय. गोंडगाव येथील शेतकरी गोविंद कुकडे यांच्या उस्मानाबादी जातीच्या नर बोकडाकडून दररोज अर्धा ते पाऊण लिटर दूध मिळत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरीरातील संप्रेरकांमध्ये झालेल्या बदलांमुळे नर प्राण्यांमधील अविकसित स्तनग्रंथी विकसित होऊन दूध तयार होऊ शकते. चाऱ्यामधील विशिष्ट हार्मोनसदृश घटकांमुळेही अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, हे अत्यंत दुर्मिळ असून अशा बोकडाचे दूध काढू किंवा वापरू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. या अनोख्या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. (Top 10 News )
3) आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी महाराष्ट्रात ड्राय डे; बार आणि दारूची दुकाने बंद
आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, २५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील सर्व दारूची दुकाने, बार आणि पब दिवसभर बंद राहणार आहेत. पंढरपूरसह राज्यभरात लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी सहभागी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आषाढी एकादशीला मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, कीर्तन आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. अनेक भाविक या दिवशी उपवास करून भगवान विठ्ठलाची आराधना करतात. त्यामुळे विकेंडला पार्टीचा बेत आखणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी. धार्मिक परंपरा आणि सार्वजनिक शांतता कायम राखण्यासाठी राज्यभरात ड्राय डेची अंमलबजावणी केली जाणार आहे. (Top 10 News )
4) शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आता 7/12 फेरफार प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत सातबारा उताऱ्यावरील फेरफार प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतलाय. नव्या व्यवस्थेनुसार अर्धन्यायिक न्यायालयांचे आदेश आता थेट डिजिटल पद्धतीने तलाठ्यांच्या कार्यालयात पोहोचणार असून, ई-क्यूजे कोर्ट प्रणालीद्वारे फेरफार प्रक्रिया आपोआप सुरू होईल. त्यामुळे आदेशाची सत्यप्रत घेण्यासाठी किंवा तलाठ्याकडे वारंवार फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. संबंधित पक्षकारांना ऑनलाइन नोटीसही तात्काळ मिळणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयामुळे फेरफार नोंदीतील विलंब कमी होऊन संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि शासकीय कार्यालयांचे हेलपाटे यामुळे मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत. (Top 10 News )
5) पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कठोर सुधारणा विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी
स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचललेय. केंद्रीय मंत्रिमंडळाने अँटी-पेपर लीक सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली असून परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झालाय. सुधारित तरतुदीनुसार, पेपरफुटीमध्ये दोषी आढळणाऱ्यांना १० वर्षांपर्यंत कारावास आणि १ कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. सरकारच्या मते, या निर्णयामुळे NEET, UGC-NETसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि रॅकेट्सवर आळा बसेल. सूत्रांच्या माहितीनुसार, हे सुधारणा विधेयक येत्या सोमवारी संसदेत मांडले जाण्याची शक्यता असून त्यावर जोरदार चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय. (Top 10 News )
6) ट्रम्प यांचा भारताला पुन्हा मोठा झटका! अमेरिकेकडून 10 टक्के टॅरिफ लागू
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह 17 देशांवरील आयातीवर 10 टक्के नवीन टॅरिफ लागू करण्याची घोषणा केलीय. हा निर्णय अमेरिकेच्या Section 301 अंतर्गत करण्यात आला असून, सक्तीच्या मजुरीतून (forced labour) तयार होणाऱ्या वस्तूंवरील बंदी प्रभावीपणे लागू न करणाऱ्या देशांवर ही कारवाई करण्यात आलीय. भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, मेक्सिको, श्रीलंका आणि ब्रिटन यांचाही या यादीत समावेश आहे. अमेरिकेच्या मते हा निर्णय मानवाधिकार आणि निष्पक्ष व्यापार धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे. या टॅरिफमुळे भारतीय वस्तूंची अमेरिकेतील किंमत वाढू शकते आणि निर्यातदारांवर अतिरिक्त आर्थिक दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. (Top 10 News )
7) मर्सिडीजची दमदार हायब्रिड कार भारतात लॉन्च
मर्सिडीज-बेंझने भारतात नवीन Mercedes-AMG E 53 हायब्रिड 4MATIC+ लक्झरी परफॉर्मन्स सेडान लॉन्च केलीय. या कारची एक्स-शोरूम किंमत ₹1.45 कोटी असून रेसिंग एडिशनची किंमत ₹1.48 कोटी आहे. यात 3.0-लिटर इनलाइन-6 टर्बो पेट्रोल इंजिन, इलेक्ट्रिक मोटर आणि 21.2kWh बॅटरी देण्यात आली असून एकत्रितपणे 585 हॉर्सपावर आणि 750Nm टॉर्क मिळतो. ही कार अवघ्या 4 सेकंदांत 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठते. 20-इंच अलॉय व्हील्स, AMG स्पोर्टी डिझाइन, 14.4-इंच टचस्क्रीन, 12.3-इंच डिजिटल क्लस्टर, Burmester ऑडिओ, पॅनोरमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि प्रगत सुरक्षा फीचर्समुळे ही कार लक्झरी व रेसिंग परफॉर्मन्सचा उत्कृष्ट संगम ठरतेय. (Top 10 News )
8) OnePlus N6x भारतात 31 जुलैला होणार लाँच; कमी किमतीत प्रीमियम फीचर्सची मेजवानी
वनप्लसने भारतीय ग्राहकांसाठी आपल्या नव्या OnePlus N6x स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत घोषणा केलीय. हा फोन 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच होणार असून Amazon आणि OnePlus ऑनलाइन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. कंपनीने या फोनसाठी स्वतंत्र मायक्रोसाइटही सुरू केली आहे. बरगंडी रेड आणि आइस ब्लू अशा दोन रंगांमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये पिल-शेप्ड रिअर कॅमेरा मॉड्यूल, एलईडी फ्लॅश, टेक्सचर्ड फ्लॅट बॅक पॅनेल आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक देण्यात आलाय. कमी किमतीत प्रीमियम अनुभव देण्याचा कंपनीचा प्रयत्न असून, बजेट स्मार्टफोन बाजारात OnePlus N6x इतर ब्रँड्सना कडवी टक्कर देण्याची शक्यता आहे. (Top 10 News )
9) ‘पाळीत तीन दिवस मी बाजूला बसते’; अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेने सांगितलं यामागचं कारण
मराठी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिने मासिक पाळीबाबत आपली भूमिका स्पष्ट करत, पाळीच्या काळात तीन ते चार दिवस आराम करण्याची सवय आजही कायम असल्याचे सांगितलेय. एका मुलाखतीत बोलताना तिने ही परंपरा अंधश्रद्धा नसून महिलांना विश्रांती देण्यामागचा उद्देश असल्याचे मत व्यक्त केलेय. आजीच्या शिकवणीनुसार ती माहेरी आणि लग्नानंतर सासरीही पाळीत वेगळी राहून स्वतःला वेळ देते, असे तिने सांगितले. या काळात विश्रांती, वाचन, नामस्मरण आणि पुरेशी झोप शरीरासाठी उपयुक्त असल्याचे तिचे मत आहे. तसेच पीसीओडी, पीसीओएससारख्या समस्यांबाबतही महिलांनी शरीराला आवश्यक विश्रांती देणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन तिने केलेय. (Top 10 News )
१ ० ) टीम इंडियाच्या २ वेगवान गोलंदाजांना बिहार सरकारचे मोठे गिफ्ट; थेट ‘डीएसपी’ पदावर नियुक्ती!
भारतीय क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि मुकेश कुमार यांना बिहार सरकारकडून मोठा बहुमान मिळालाय. २४ जुलै रोजी पाटणा येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या हस्ते ‘मेडल लाओ, नौकरी पाओ’ योजनेअंतर्गत या दोन्ही खेळाडूंना थेट पोलीस उपाधीक्षक (DSP) पदाचे नियुक्ती पत्र सोपवण्यात आलेय. या कार्यक्रमात एकूण १९ खेळाडूंना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या, ज्यात आशियाई अंडर-२३ विजेती एथलीट सेतु मिश्रा हिला ३७.५० लाख रुपयांची सन्मान राशी प्रदान करण्यात आली. सध्या हे दोन्ही गोलंदाज दुखापत आणि खराब फॉर्ममुळे भारतीय संघाबाहेर असून, या बहुमानामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. (Top 10 News )





