French Open 2025 : वाइल्डकार्डची चमत्कारिक झेप; लोइस बोइसनने फ्रेंच ओपनमध्ये रचला इतिहास!

Lois Boisson Makes History at French Open 2025 : जागतिक क्रमवारीत ३६१व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या महिला टेनिसपटू लोइस बोइसनने इतिहास रचला आहे. ती ओपन एरामध्ये फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली वाइल्डकार्ड खेळाडू ठरली आहे. तसेच, २०११ नंतर असे करणारी पहिली फ्रान्सची महिला खेळाडू देखील बनली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने १६व्या फेरीत तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाला पराभूत केले होते.
बोइसनने आतापर्यंत फक्त एकच सामना जिंकला होता –
आता तिने सहाव्या मानांकित मिर्रा एंड्रीव्हालाही हरवले आहे. हा सामना तिने ७-६, ६-३ अशा फरकाने जिंकला. गेल्या ४० वर्षांत ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी ती सर्वात कमी रँकची खेळाडू ठरली आहे. वाईल्डकार्ड म्हणून तिचा पहिला ग्रँड स्लॅम खेळण्यापूर्वी लॉस बोइसनने डब्ल्यूटीए टूरमध्ये फक्त एकच मुख्य ड्रॉ सामना जिंकला होता.
LOIS BOISSON.
REMEMBER THE NAME.#RolandGarros pic.twitter.com/brvgyZydRe— Roland-Garros (@rolandgarros) June 4, 2025
परंतु टॉप १० प्रतिस्पर्ध्यांवर तिने सातत्याने विजय मिळवल्याने तिने टेनिस जगतात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. १९८० नंतर ग्रँड स्लॅमच्या मुख्य ड्रॉ पदार्पणात उपांत्य फेरी गाठणारी ती तिसरी खेळाडू आहे. तिच्या आधी फक्त मोनिका सेलेस (१९८९) आणि जेनिफर कॅप्रियाती (१९९०) यांनाच असा पराक्रम करता आला आहे.
हेही वाचा – Bengaluru Stampede : आरसीबीच्या ‘त्या’ पोस्टने घेतले ११ जणांचे प्राण, चौकशीची टांगती तलवार!
हे अविश्वसनीय आहे – लोइस बोइसन
उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकल्यानंतर ती म्हणाली, “हे अविश्वसनीय आहे. मला असा पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडे आभार व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. सुरुवातीला मी खूप तणावात होते, त्यामुळे मी थोडी जास्त धावपळ केली. पण पहिल्या सेटमध्ये मी खूप मेहनत घेतली, तो सेट खूपच तीव्र होता. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला मला थोडं रिकामेपण जाणवलं, पण मी टिकून राहिले आणि शेवटी मोहीम फत्ते केली.”
हेही वाचा – Match Fixing : क्रिकेट विश्वात खळबळ; श्रीलंकेचा विश्वविजेता खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी!
पहिल्या सेटमधील पिछाडीनंतर जबरदस्त कमबॅक –
पहिल्या सेटमध्ये १-३ आणि नंतर ३-५ अशा पिछाडीवर असतानाही बोइसनने अप्रतिम संयम दाखवला. गोंधळून न जाता, तिने आपल्या खास फोरहँड विनर्सचा वापर करत सामन्यात पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमध्ये तिने एंड्रीवाच्या एकाग्रतेतील त्रुटीचा पुरेपूर फायदा घेत विजय मिळवला. पुढील फेरीत तिला दुसऱ्या मानांकित कोको गॉफकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.





