Pune District : सोमेश्वरच्या रणांगणात चार पॅनल?
Pune District : सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली असून कारखाना कार्यालयात विविध दाखले काढण्यासाठी सभासद व इच्छुकांची गर्दी होत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता सोमेश्वर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे चित्र असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भाजप आणि शिवसेना यांनीही स्वतंत्रपणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.
चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र आणि सुमारे २९ हजार सभासद असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेअरमन व संचालक मंडळाने यापूर्वीच विविध गट व गावांमध्ये घोंगडी बैठका घेत सभासदांशी संपर्क साधला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी होळ येथे सभासद व शेतकरी मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. नव्या-जुन्यांचा समन्वय साधत सर्वसमावेशक संचालक मंडळ उभे करण्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच अजितदादांनी सोमेश्वर कारखान्यासाठी केलेल्या कामांचा, सभासदांप्रती असलेल्या निष्ठेचा आणि ऊस उत्पादकांना मिळालेल्या दराचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले.
युगेंद्र पवारांकडून स्वतंत्र पॅनेलचे संकेत
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेत कारखाना निवडणुकीत सक्रिय सहभाग जाहीर केला आहे. मुरूम येथील पक्षप्रवेश मेळावा तसेच निंबूत येथील मेळाव्याला सभासद व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. संचालक मंडळाच्या मर्जीतील कामगार भरती, वर्षानुवर्षे संचालक मंडळात कायम असलेले चेहरे, साखरेचे वाढलेले दर व त्या तुलनेत ऊस उत्पादकांना मिळणारा दर, ऊस तोडणीला होणारा उशीर तसेच गेटकेन उसाबाबतची भूमिका या मुद्द्यांवर युगेंद्र पवार यांनी भूमिका मांडली आहे. उच्चशिक्षित तरुण, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा मेळ घालत पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
भाजपचीही जोरदार मोर्चेबांधणी
भाजपनेही निंबूत येथे सभासद व कार्यकर्त्यांचा मेळावा घेत सोमेश्वरच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. सहकार महर्षी चंद्रराव तावरे, पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, शेखर वडणे, दिलीप खैरे, डॉ. नितीन सावंत, दिग्विजय काकडे, वैभव सोलंनकर आदी पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करत निवडणुकीच्या तयारीला वेग देण्याचे आवाहन केले.
शिवसेनेचे विजय शिवतारेही मैदानात
माजी राज्यमंत्री तथा पुरंदरचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांनीही सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे, शेतकरी हिताचे सर्वसमावेशक पॅनल उभारून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवावी आणि सर्व जागांवर पॅनल उभे करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
युती-माघारीच्या समीकरणांकडे लक्ष
राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना हे घटक पक्ष एकत्र असले तरी सोमेश्वर कारखाना निवडणुकीत स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत कोण माघार घेणार, कोणाची युती होणार, कोण कोणाला पाठिंबा देणार आणि प्रत्यक्ष मैदानात किती पॅनल राहणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
युवकांचा वाढता सहभाग
यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने युवक सभासद निवडणुकीच्या मैदानात सक्रिय होताना दिसत आहेत. विविध राजकीय गटांकडून तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरू असल्याने संचालक मंडळाच्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.





