Pune District : वाघोली-केसनंद-लोणीकंदच्या वाहतूक कोंडीवर नागरिक आक्रमक
Pune District : लोणीकंद-केसनंद मार्गावरील गोविंद बाग सभागृहात रविवारी (दि. 6) झालेल्या बैठकीत परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

वाघोली : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाघोली, केसनंद आणि लोणीकंद परिसरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीवर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पुणे-अहिल्यानगर रोड वाहतूक कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला.
लोणीकंद-केसनंद मार्गावरील गोविंद बाग सभागृहात रविवारी (दि. 6) झालेल्या बैठकीत परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्येच्या तुलनेत रस्ते व वाहतूक व्यवस्थेचा विकास न झाल्याने सकाळ-सायंकाळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिक, विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक तसेच अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असून वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांनाही याचा फटका बसत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर नागरिकांना एकत्र आणण्यासाठी कृती समितीने सामाजिक माध्यमांवर गट तयार केला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ संबंधित विभागांपर्यंत तातडीने पोहोचविले जात असल्याने काही ठिकाणी तत्काळ कारवाई होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वाघोली, केसनंद आणि लोणीकंद परिसरातील प्रमुख चौकांचे रुंदीकरण करावे, पर्यायी मार्ग सुरू करावेत, वाढत्या वाहतुकीनुसार रस्त्यांची क्षमता वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय विरुद्ध दिशेने वाहन चालविणार्यांवर कठोर कारवाई करणे, वाहतुकीस अडथळा ठरणारे महावितरणचे विद्युत खांब हटविणे, महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, रस्त्यावर अनधिकृतपणे उभी राहणारी प्रवासी वाहने हटविणे, तसेच लक्झरी बस आणि अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
सिग्नल व वाहतूक पोलिसांची नियुक्ती करा
गर्दीच्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था, बॅरिकेडिंग आणि वाहतूक पोलिसांची प्रभावी नियुक्ती करावी. अपघातप्रवण आणि वारंवार कोंडी होणार्या ठिकाणांची ओळख करून तेथे कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, असा आग्रह समितीने धरला.
कारवाई न झाल्यास आंदोलन
वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सविस्तर निवेदन देण्यात येणार असून तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी केली जाणार आहे. मात्र, यानंतरही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर उपोषण, आंदोलन आणि लोकशाही मार्गाने तीव्र संघर्ष करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला. वाहतूक कोंडीचा प्रश्न हा आता केवळ वाहनचालकांचा न राहता हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी वाहतूक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.





