Pune District : दिवसा वीजपुरवठ्यासाठी शेतकर्यांचा रास्ता रोको
Pune District : ‘दिवसा आठ तास वीज द्या; रात्रीचा जीवघेणा वीजपुरवठा बंद करा,’ अशी जोरदार मागणी करत शेतकर्यांनी महावितरणच्या सध्याच्या वेळापत्रकाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

न्हावरे : एकीकडे बिबट्यांची दहशत आणि दुसरीकडे शेतीपंपांसाठी रात्रीचा वीजपुरवठा, या दुहेरी संकटामुळे करडे (ता. शिरूर) परिसरातील शेतकर्यांचा संताप अखेर रस्त्यावर आला. शेतीपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या वृषाली वाळके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. 8) शिरूर-चौफुला मार्गावरील करडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
महावितरणच्या शिरूर उपविभागांतर्गत येणार्या परिसरातील शेतीपंपांना सध्या रात्री 9.45 ते पहाटे 3.45 या वेळेत सहा तास वीजपुरवठा केला जात आहे. कागदोपत्री सहा तासांचा वीजपुरवठा असला, तरी प्रत्यक्षात मोटार सुरू करण्यासाठी, वीजपुरवठा तपासण्यासाठी आणि पिकांना पाणी देण्यासाठी शेतकर्यांना मध्यरात्री घराबाहेर पडून शेतात जावे लागत आहे. करडे गाव व परिसर बिबटप्रवण क्षेत्रात येत असल्याने रात्री शेतात जाणे शेतकर्यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा धोका असताना केवळ वीज वेळापत्रकामुळे शेतकर्यांना रात्रीच्या अंधारात शेतात जाण्यास भाग पाडणे कितपत योग्य, असा सवाल यावेळी करण्यात आला.
‘दिवसा आठ तास वीज द्या; रात्रीचा जीवघेणा वीजपुरवठा बंद करा,’ अशी जोरदार मागणी करत शेतकर्यांनी महावितरणच्या सध्याच्या वेळापत्रकाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकर्यांची सुरक्षितता, पिकांचे संरक्षण आणि परिसरातील बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन तातडीने वीज वेळापत्रक बदलण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनाची तातडीने दखल घेत महावितरणच्या केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक जाधव यांनी शेतकर्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी महावितरण शिरूरचे उपकार्यकारी अभियंता सुहास माने यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेण्यात येईल. संबंधित काम युद्धपातळीवर पूर्ण करून त्यानंतर शेतकर्यांना दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर वृषाली वाळके यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, केवळ आश्वासनावर समाधान मानणार नसल्याचा स्पष्ट इशारा शेतकर्यांनी दिला आहे. दिवसा आठ तास वीजपुरवठ्याचे सुधारित वेळापत्रक लागू न झाल्यास सोमवार, दि. 14 सप्टेंबर 2026 रोजी न्हावरे फाटा येथे शेतकर्यांना सोबत घेऊन अहिल्यानगर-पुणे महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा बबन वाळके यांनी दिला. त्यामुळे महावितरणने दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड, लंघेवाडीचे माजी सरपंच संतोष लंघे, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास वाळके, बबन वाळके, गोरख बेंद्रे, राजेंद्र बेंद्रे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर व पोलीस कर्मचार्यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवला.
सत्ताधार्यांनाच आंदोलनाची वेळ
राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सत्तेत असताना शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्यांनाच आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याची टीका यावेळी करण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्यांना विविध आश्वासने देण्यात आली; मात्र पिकांचे घसरलेले बाजारभाव, खतांच्या वाढलेल्या किमती आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांमुळे शेतकरी अडचणीत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.शेतीपंपांसाठी रात्रीचा वीजपुरवठा सुरू असल्याने बिबटप्रवण क्षेत्रातील शेतकर्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्यांनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे हे दुर्दैवी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





