Pune District : गणेश मूर्तींच्या किमतीत सुमारे 30 टक्के वाढ
Pune District : गणेशमूर्ती विक्रेत्यांनी विविध आकार आणि आकर्षक स्वरूपातील मूर्ती उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात पर्याय मिळत आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींनाही नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पौड बाजारपेठेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

पौड : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पौड परिसरात गणेशोत्सवाची लगबग वाढली आहे. विविध आकार, आकर्षक रंगसंगती तसेच पारंपरिक आणि आधुनिक रूपातील गणपती बाप्पांच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, या मूर्ती पाहण्यासाठी आणि पसंत करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
घरगुती गणपतीच्या स्थापनेसाठी भाविकांकडून आपल्या आवडीच्या बाप्पांच्या मूर्तीची निवड केली जात आहे. विशेषतः लहान मुले पालकांसोबत गणपतीच्या मूर्ती पाहण्यासाठी बाजारपेठेत येत असून, आपल्या आवडीची मूर्ती पसंत करण्याचा त्यांचा उत्साह दिसून येत आहे. गणेशमूर्ती विक्रेत्यांनी विविध आकार आणि आकर्षक स्वरूपातील मूर्ती उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात पर्याय मिळत आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींनाही नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पौड बाजारपेठेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
पौड येथील कुंभारवाड्यात घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांसाठी लहान-मोठ्या आकाराच्या मूर्तींची बुकिंग करण्यासाठी नागरिक आणि मंडळांचे कार्यकर्ते येत आहेत. यंदा मूर्ती तयार करण्यासाठी लागणार्या साहित्याच्या खर्चात वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे 30 टक्के वाढ झाली असल्याचे मूर्तिकार श्रीकांत मधुकर कुंभार यांनी सांगितले.





