Iran US War: होर्मुझ सामुद्रधुनी संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवी भूमिका घेतली आहे. या महत्त्वाचा सागरी मार्ग खुला ठेवण्यासाठी आता केवळ अमेरिकाच नव्हे, तर चीन, फ्रान्स आणि ब्रिटनसह अनेक देशांनी आपले नौदल तैनात करावे, असे आवाहन ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टद्वारे केले आहे. इराणच्या कारवायांमुळे ज्या देशांचा व्यापार प्रभावित होत आहे, त्यांनी अमेरिकेसोबत मिळून या भागात युद्धनौका पाठवाव्यात, असे ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. या देशांकडे मागितली मदत ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये विशेषतः चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन या देशांचा उल्लेख केला. या देशांची ऊर्जा पुरवठा व व्यापार मोठ्या प्रमाणात होर्मुझ सामुद्रधुनीवर अवलंबून असल्यामुळे या “अडथळ्या”ला दूर करण्यात त्यांनी सहभाग घ्यावा, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. हे देश लवकरच आपल्या जहाजा त्या भागात पाठवतील आणि इराणकडून निर्माण झालेला धोका संपवतील, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली. इराणच्या लष्करी क्षमतेवर ट्रम्प यांचा दावा ट्रम्प यांनी धक्कादायक दावा करत सांगितले की अमेरिकेने इराणची १०० टक्के लष्करी क्षमता आधीच नष्ट केली आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी इशाराही दिला की इराण “पूर्णपणे खिळखिळा” झाला असला तरी तो अजूनही छोटे हल्ले करण्यास सक्षम आहे. इराण अजूनही ड्रोन पाठवणे, समुद्रात सुरुंग पेरणे किंवा कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागण्याच्या स्थितीत असल्याने सागरी वाहतुकीला धोका कायम असल्याचे ट्रम्प म्हणाले. होर्मुझ सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का? जागतिक नकाशावर होर्मुझ सामुद्रधुनी हा एक छोटासा जलमार्ग असला तरी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी तो एखाद्या ‘जीवनरेषे’सारखा आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील तेल आणि नैसर्गिक वायू (LNG) व्यापार याच मार्गाने होतो. आशिया व युरोपच्या बाजारपेठांपर्यंत कच्चे तेल पोहोचविण्यासाठी हा सर्वात मुख्य मार्ग आहे. या मार्गात थोडाही अडथळा आला तर संपूर्ण जगात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडतात. हेही वाचा – महासत्ता असूनही अमेरिका इराणविरुद्धची लढाई अजून का जिंकू शकला नाही? जाणून घ्या पाच मोठी कारणे अमेरिकेची लष्करी कारवाई सुरूच ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की अमेरिकी सेना पुढेही गप्प बसणार नाही. अमेरिकी सैन्य इराणच्या किनारी भागाजवळ लष्करी कारवाई करत असून इराणी जहाजे बुडवली जात आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित व मुक्त करूनच अमेरिका थांबेल, असे आश्वासन त्यांनी दिले.