#TeamIndia | क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी ‘अजय रात्रा’चाही अर्ज

मुंबई – भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या माजी यष्टीरक्षक अजय रात्रा याने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील काही प्रशिक्षकांचीही मुदत संपत असून, त्यामुळेच नव्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते.
मुख्य प्रशिक्षक शास्त्रींसह क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचाही करार संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नियुक्ती होण्यासाठी रात्रा याच्यासह अनेकांनी अर्ज दाखल केला आहे.
फरिदाबादमध्ये जन्मलेल्या रात्राने भारताकडून 6 कसोटी व 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणीचे 99 सामने खेळले आहेत. तो भारतासाठी परदेशात कसोटी शतक साकार करणारा पहिला यष्टीरक्षक आहे.
2002 साली वेस्ट इंडीज संघाविरुद्ध रात्राने शतक फटकावले होते. या कामगिरीनंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर गेला आणि परत संघात पुनरागमन करू शकला नाही. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहप्रशिक्षक म्हणून तो कार्यरत आहे. तसेच त्याने भारतीय महिला संघासोबतही काम केले आहे.





