Asha Bhosle Last Post : भारतीय संगीतविश्वातील दिग्गज आणि सदाबहार गायिका आशा भोसले (Asha Bhosle Last Post) यांचे आज, रविवार १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांनी (Asha Bhosle Last Post) सुमारे आठ दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपट संगीताला आपल्या अद्वितीय आणि बहुमुखी आवाजाने समृद्ध केले. त्यांनी १२,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली असून, हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगूसह २० हून अधिक भाषांमध्ये त्यांचा आवाज ऐकला गेला. लता मंगेशकर यांच्या बहिण असलेल्या आशा ताईंनी ‘दुम मारो दुम’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘दिल चीज क्या है’ सारख्या अमर गाण्यांमधून लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या कारकिर्दीला १९४३ मध्ये बालवयात सुरुवात झाली आणि त्यांनी संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन विश्व, राजकीय क्षेत्र आणि रसिकांमध्ये शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांसह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी निधनाची पुष्टी केली. अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव आज सकाळी लोअर परेल येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार असून, उद्या सोमवार १३ एप्रिल रोजी शिवाजी पार्क येथे पूर्ण राज्य सन्मानाने अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. Asha Bhosle Death: अखेरची पोस्ट: जीवन, संगीत आणि मोक्षाचा गहन संदेश आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या सोशल मीडियावरील १८ मार्च रोजी शेअर केलेल्या अखेरच्या पोस्टची विशेष चर्चा होत आहे. ‘The Shadowy Light’ या गाण्याबद्दल त्यांनी भावनिक आणि अध्यात्मिक विचार मांडले होते. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते “‘The Shadowy Light’ या गाण्याचा माझ्यासाठी अत्यंत गहन अर्थ आहे. वाराणसीला भेट देऊन, पवित्र गंगा नदीच्या प्रवासात सहभागी होताना आणि त्या दृश्यांचे बारकाईने निरीक्षण करताना मला जीवनाचा खरा अर्थ उमजला. मी कोण आहे आणि या पृथ्वीतलावर मला नक्की काय करायचे आहे, याची जाणीव झाली. या गाण्यातील खोलवर वाहणाऱ्या नदीला पार करणे हे माझ्या जीवनप्रवासाचे प्रतीक आहे. माझा जन्म, नातेसंबंध, संगीताप्रती निष्ठा, कर्तृत्वे आणि एक कन्या, माता, भगिनी, पत्नी व एक हिंदू भारतीय म्हणून माझी कर्तव्ये यांचे ते प्रतिनिधित्व करते. या जीवन नदीला पार करण्यासाठी मदत करणारा नावाडी म्हणजे माझे संगीत होय. तोच माझा मार्गदर्शक आहे. जेव्हा मी नदीच्या दुसऱ्या तीरावर पोहोचेन, तेव्हा माझा जीवनप्रवास पूर्ण होईल आणि मला मोक्ष (परम मुक्ती) प्राप्त होईल. त्या अवस्थेत मी सभोवताली तरंगणाऱ्या हजारो नादांपैकी एक नाद बनून जाईन. जर त्या नादांना एकत्र गुंफले तर एक सुंदर सुरावट निर्माण होते. म्हणून मीही त्या नादांपैकी एक नाद बनेन, जो कालांतराने एका सुंदर गीतातील ‘सूर’ बनेल आणि ते गीत पुढील हजारो वर्षे अनेक पिढ्यांकडून ऐकले जाईल. निसर्गाशी एकरूप होण्याची ही मुक्तीच नदीच्या दुसऱ्या तीरावर माझी प्रतीक्षा करत आहे.” या पोस्टमध्ये आशा भोसले यांनी जीवन, संगीत, गंगा नदी, वाराणसीच्या पवित्रतेतून मिळालेला आत्मिक अनुभव आणि मोक्षाची कल्पना यांचा सुंदर संगम सादर केला होता. संगीताला आपल्या जीवनातील मार्गदर्शक आणि नावाडी म्हणून त्यांनी अभिमानाने उल्लेख केला होता.