माजी आमदाराची फॉर्च्युनर कुऱ्हाडीने फोडली; धक्कादायक कारण समोर?

यवतमाळ : झरी जामनी तालुक्यातील दुर्भा गावात शेतजमिनीच्या वादातून माजी आमदार वामनराव कासावार यांची आलिशान फॉर्च्युनर कार कुऱ्हाडीने फोडण्यात आली. ठेक्याने घेतलेल्या शेतात पेरणीवरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाले, आणि संशयित आरोपीने कारची तोडफोड करत सुमारे 2 लाखांचे नुकसान केले. पाटण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सचिन पंचरे (वय 35, रा. दुर्भा) यांनी जिल्हा परिषद शाळेची 14 एकर शेती 2025-26 साठी वार्षिक 70,000 रुपये भाड्याने घेतली आहे. पेरणीसाठी ते माजी आमदाराच्या MH29BP0505 क्रमांकाच्या फॉर्च्युनर गाडीसह शेतात गेले असता, गावातील पेंन्टना गोंटीमुकुलवार, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा करण यांनी शेतावर दावा सांगितला.
त्यांनी पेरणी थांबवण्याचा प्रयत्न केला आणि “हे शेत आमचे” असा दावा करत वाद घातला. पंचरे यांनी ठेका असल्याची माहिती दिली, पण वाद विकोपाला गेला. यावेळी पेंन्टना यांनी कुऱ्हाडीने गाडी फोडली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
वामनराव कासावार कोण?
वामनराव कासावार हे 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर वणी विधानसभेतून आमदार म्हणून निवडून गेले होते. यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 2014 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.





