यवतमाळ : अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेश रणधीर (वय ५२) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराच्या १० लाख रुपयांच्या वसुली प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात त्यांनी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती. या कारवाईमुळे यवतमाळ पोलिस दलात संताप आणि खळबळ उडाली असून, ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपर्यंत सुरू होती. तक्रारदाराने सहा महिन्यांसाठी आपल्या मित्राला १० लाख रुपये कर्ज दिले होते, पण मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. याप्रकरणी १० डिसेंबर रोजी तक्रारदाराने अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तक्रारीची दखल घेत पैसे वसूल करण्याच्या बदल्यात रणधीर यांनी ३ लाख रुपयांची लाच मागितली. नाराज तक्रारदाराने अमरावती ACB कडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. ACB ने तात्काळ सापळा रचला. आज शुक्रवारी सकाळी पडताळणीदरम्यान रणधीर यांनी ३ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास होकार दिला. दुपारी ठाण्यातील त्यांच्या दालनात पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये घेताना ACB पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. मूळचे जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरचे रहिवासी असलेले रणधीर सध्या यवतमाळ शहरात कार्यरत आहेत. या प्रकरणाची चौकशी अमरावती ACB चे पोलीस निरीक्षक संतोष कुरवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, रणधीर यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस वर्तुळातून या घटनेमुळे मनोबल खालावले असल्याचे सांगितले जात आहे, तर भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला नव्याने चालना मिळाल्याचे ACB चे म्हणणे आहे. पुढील तपासात आणखी काही नावे समोर येतील का, हे पाहावे लागेल.