मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Former MLA Krishnarao Bhegde passes away : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्याचे माजी आमदार शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात कन्या, जवाई, दोन बहिणी, पुतणे, भाचे असा मोठा परिवार परिवार आहे. भेगडे यांच्या निधनामुळे मावळ तालुक्यातील सर्व क्षेत्रांची मोठी हानी झाली आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजाताच राजकीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. शिक्षणमहर्षी अशी ओळख असलेले माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी दोन वेळा मावळ तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. तसेच काही वर्ष ते विधानपरिषदेचे आमदार होते. जनसंघपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. मावळ तालुक्यातील धुरंधर नेते अशी त्यांची ओळख जनमाणसात होती.
कृष्णराव भेगडे यांना शिक्षणमहर्षी म्हटले जाते, याचे कारण म्हणजे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांनी मावळ तालुक्यात ठिकठिकाणी संस्थेच्या माध्यमातून शाळा विद्यालये आणि महाविद्यालये सुरु केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तसेच शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील फेसबुकवर कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भोरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनी देखील फेसबुक पोस्टद्वारे भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हेही वाचा : “‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर झाले तर….” ; एलॉन मस्कचे डोनाल्ड ट्रम्प यांना खुले आव्हान





