Maharashtra Politics : काँग्रेसची पडझड सुरुचं; दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर, राजकीय समीकरणे बदलणार?

Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीने राज्यभरात आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यवतमाळ आणि नंदूरबारमध्ये काँग्रेसला मोठे धक्के बसले असून, यवतमाळमधील एक दिग्गज नेता भाजपच्या वाटेवर आहे, तर नंदूरबारमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
यवतमाळमध्ये भाजपने काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पवार यांनी काँग्रेसच्या स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वावर सडकून टीका केली आहे.
पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि दुफळीमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. पवार यांच्या पक्षांतरामुळे यवतमाळच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजपच्या या खेळीमुळे महायुतीची ताकद आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नंदूरबारमध्ये शिंदे गटाचा दबदबा
नंदूरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात काँग्रेसला आणखी एक मोठा फटका बसला आहे. येथील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दहेल आणि खोडी येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांसह काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी अक्कलकुवा-अक्राणी विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षांतरामुळे अक्कलकुवा तालुक्यात शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे, तर काँग्रेसची पकड कमकुवत होण्याची भीती आहे.





