भाजपला धक्का; माजी मंत्र्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

Big Setback for BJP in Nandurbar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे नेते आणि माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
बुलढाण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात वळवी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश सोहळा बुलढाण्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. वसंत पुरके, प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे, बुलढाणा शहराध्यक्ष दत्ता काकस, इरफान पठाण यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पद्माकर वळवी यांच्या प्रवेशाने नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला आणखी ताकद मिळेल. लवकरच नंदुरबारात भव्य कार्यक्रमात त्यांच्या सहकाऱ्यांना औपचारिक प्रवेश देण्यात येईल. काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि लोकशाही तसेच संविधान अबाधित राखणारा आहे. इतर पक्षांमधूनही अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असं सपकाळ म्हणले.
दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून काँग्रेसमध्ये ‘इनकमिंग’चा वेग वाढला आहे. यापूर्वी परभणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी हजारो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
पद्माकर वळवी यांचा राजकीय प्रवास
पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील शहादा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रमुख आदिवासी नेते होते. त्यांनी 2009 मध्ये शहादा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकली होती, परंतु 2014 मध्ये ते पराभूत झाले. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रमुख चेहरा असलेले वळवी यांनी 13 मार्च 2024 रोजी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
त्यावेळी त्यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि समन्वयाच्या अभावामुळे नाराजी व्यक्त केली होती. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धती आणि केंद्र-राज्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे कौतुक केले होते.
मात्र, अवघ्या दीड वर्षातच वळवी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये ‘घरवापसी’ केली आहे. त्यांच्या या पक्षांतरामागील कारणे स्पष्ट झालेली नसली, तरी नंदुरबारातील स्थानिक निवडणुकांपूर्वी त्यांच्या प्रवेशाने काँग्रेसला आदिवासी समाजात पुन्हा बळ मिळण्याची शक्यता आहे. वळवी यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या स्थानिक पातळीवरील ताकदीला धक्का बसण्याची शक्यता आहे.





