धनगर आरक्षणावरून सरकारवर नाराजी; विधानसभेपूर्वी माजी मंत्र्यांनी दिली राजीनामा

Padmakar Valvi | विधानसभेपूर्वी भाजप नेते पद्माकर वळवी यांनी भाजपला रामराम केला आहे. राज्य सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ भाजप सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे पत्र वळवी यांनीभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवले आहे.
यात माजी मंत्री पद्माकर वळवी म्हणाले की, ‘मी भाजपची साथ सोडत आहे. राज्यात आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न सुरु आहे. त्यावरून मी माझी सामाजिक आणि आर्थिक भूमिका आदिवासींच्या वतीने मांडली होती. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तरीही सरकारने याबाबत अद्याप कोणतही भूमिका घेतलेली नाही. मी आदिवासी नेता असून त्यांच्या प्रश्नांवर काम केलं आहे’.
‘मी अनेकदा आदिवासींच्या प्रश्नांसाठी सरकारशी चर्चा करत आलो आहे. धनगर समाज प्रस्थापित आहे. तो समाज आदिवासींच्या आरक्षणात येऊ इच्छित आहे. सरकारने त्यांना आश्वासन दिले आहे. त्याचा निषेध म्हणून मी माझ्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे’, असे वळवी यांनी सांगितले.
नरहरी झिरवाळ यांचाही विरोध
दरम्यान, राज्यातील महायुती सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे, एसटी म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गातील नेत्यांनी विरोध दर्शवत सरकारविरुद्ध आंदोलन केले आहे.
माजी विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी देखील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला स्पष्ट विरोध दर्शविला. राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन अध्यादेश काढला तर राज्यातील 60 ते 65 आमदार राजीनामा देतील, असा इशाराही नरहरी झिरवाळ यांनी दिला होता.
लोकसभेपूर्वी केला भाजपमध्ये प्रवेश
राज्यातील आदिवासींचा आक्रमक चेहरा म्हणून माजी मंत्री पद्माकर वळवी ओळखले जातात. लोकसभेपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. २०२४ मध्ये नंदुरबार येथे राहुल गांधी आले असताना पद्माकर वळवी यांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. मात्र विधानसभेपूर्वी त्यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार का? हे पाहावे लागणार आहे.

