Padmakar Valvi । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचा तिढा काही केल्या सुटत नाही. त्यातच काही दिवसापूर्वी काँग्रेसचे विश्वासू आणि ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची ओळख होती ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते पद्माकर वळवी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
काँग्रेसचे माजी मंत्री आणि आदिवासी नेते पद्माकर वळवी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पद्माकर वळवी हे नंदुरबारच्या शहादा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार आहेत. राज्याचे माजी क्रीडा मंत्री वळवी हे नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख चेहऱ्यांपैकी एक आहेत.
राहुल गांधी महाराष्ट्रात असताना भाजप प्रवेश Padmakar Valvi ।
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात आहे. असे असताना वळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याआधी वाराणसीचे माजी खासदार राजेश मिश्रा यांनीही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कोण आहेत पद्माकर वळवी? Padmakar Valvi ।
पद्माकर वळवी हे २००९ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदारपदी निवडून आले होते. पद्माकर वळवी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यांच्यावर क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी होती. तर नंदुरबारच्या पालकमंत्रिपदाची धुराही त्यांच्याकडे होती. मात्र २०१४ मध्ये वळवींना पराभवाचा धक्का बसला. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या चेहऱ्यांपैकी ते एक मानले जात. पद्माकर वळवी यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या आहेत.
हेही वाचा
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक झटका ; ‘या’ बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी