हैदराबाद – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार जी विवेक व्यंकटस्वामी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.कॉंग्रेस कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले की, पक्षाने त्यांचे मनापासून स्वागत केले.
विवेक यांनी गेल्या वर्षी मुनुगोडे विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती. परंतु त्यात ते पराभूत झाले.भाजपचे आणखी एक ज्येष्ठ नेते कोमातिरेड्डी राज गोपाल रेड्डी यांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेलंगणात सत्तारूढ बीआरएस आणि कॉंग्रेस यांच्यात सरळ लढत होत असून भाजपला या राज्यात फारच कमी संधी आहे. त्यातच भाजपचे अनेक नेते सध्या पक्ष सोडून कॉंग्रेस मध्ये जात असल्याने भाजपपुढे त्या राज्यात विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.