Amol Mitkari : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर भाजपचे राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देणारे विधान केले आहे. ‘अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही’ असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे विधान करतानाच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या बाळराजे पाटील यांचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आमदार अमोल मिटकरी यांनी घेतला आहे. पाटील यांच्या अजित पवार यांच्याबद्दल बोट दाखवून केलेल्या विधानावर मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आला आहे. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच. पण तूर्तास या औलादींच्या मस्तीच्या वागण्याने “मालकाला” भिकारी बनवेल.. तुर्तास इतकेच असा जिव्हारी लागणारा वार अमोल मिटकरी यांनी बाळराजे पाटील यांच्यावर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक चर्चेचा विषय ठरली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणाऱ्या राजन पाटील यांनी आपल्या हातावरचे घड्याळ काढूळ कमळ घेतले. यामुळे स्थानिक पातळीवरच राजकीय समीकरणे बदलली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप आमने सामने आले होते. १७ जागा बिनविरोध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून उज्ज्वला थिटे यांना मैदानात उतरण्यात आले होते. या निवडणुकीसाठी भाजपकडून राजन पाटील यांच्या सून रिंगणात होत्या. या निवडणुकीसाठी राजन पाटील यांच्या पॅनेलच्या १७ जागा समोर कोणीही उमेदवारच उभा नसल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी शड्डू ठोकल्याने राजन पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. बाळराजे पाटील यांच्याकडून जल्लोष मात्र, मंगळवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवार अर्ज नाट्यमयरित्या बाद ठरवण्यात आला. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती. या कारणामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायतीसाठी एकच जल्लोष केला होता. राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी समर्थकांसह जोरदार जल्लोष केला. हेही वाचा : विद्यार्थ्यांसह मौलानांविषयीची माहिती आता ATS ला द्यावी लागणार ; ‘या’ राज्यातील मदरशांसाठी नवीन नियम