Satara | भाजपची पहिली यादी जाहीर; कराड दक्षिणमधून अतुल भोसले यांना संधी

सातारा, (प्रतिनिधी) – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. यामध्ये सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
कराड दक्षिण मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपला अनुकुल वातावरण असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये भाजपने ‘सेफ गेम’ खेळल्याची चर्चा आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी यादीची राजकीय वर्तुळासह सर्वांनाच उत्सुकता होती. मुंबईमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघांवर भाजपची मजबूत पकड असल्याने, या मतदारसंघांमधील उमेदवारीबाबत विशेष चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे सातारा-जावळीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
उमेदवारी यादी जाहीर होताच, समर्थकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची ‘सुरुची’ या निवासस्थानी येथे भेट घेऊन, त्यांचे अभिनंदन केले.
अधिकृत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहर, तालुका आणि जावळी तालुक्यात संपर्क अभियान गतिमान केले आहे.
माण-खटाव विधानसभा मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून विरोधकांना बॅकफूटवर ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीतही आमदार गोरे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आपल्या विधानसभा मतदारसंघातून मोठी आघाडी दिली होती.
त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने आमदार जयकुमार गोरे यांनाच पुन्हा संधी दिलीआहे. गोरे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार उतरवला जातो, याची उत्सुकता आहे.
मागील निवडणुकीत ‘आमचं ठरलंय’ या टीमच्या नेत्यांनी आ. गोरे यांना विरोध केला होता. यंदाच्या निवडणुकीतील उमेदवारीबाबत या टीमचे नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये भाजपची ताकद दाखवले होते.
त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांना तेथून मताधिक्य मिळाले होते. डॉ. अतुल भोसले यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी होणार, हे निश्चित आहे, डॉ. भोसले यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे विणून, पक्षाचा विस्तार केला आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने त्यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब केले आहे.
यावेळी ते विजय खेचून आणतील, असा पक्षश्रेष्ठींचा विश्वास आहे. भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकल्यास, सातारा जिल्ह्यात जिथे उमेदवारांना दगाफाटका होणार नाही, अशा सुरक्षित मतदारसंघांमधील उमेदवार आधी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे.





