Uddhav Thackeray – वन नेशन वन इलेक्शन च्या प्रथम निवडणूक आयुक्ताची निवड निवडणूकीतून करावी, अशी मागणी शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. वन नेशन वन इलेक्शन घेण्यास हरकत नाही मात्र ते पारदर्शक असले पाहिजे. नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता नवीन सरकार महाराष्ट्रात आले आहे. आपण आधी अडीच वर्षे घटनाबाह्य सरकार पाहिले आहे. त्यानंतर या निवडणुकीत निकाल अनाकलनीय लागला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण, आज विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक रंगली आहे. मंत्रिपद ज्यांना मिळाले आहे त्यापेक्षा नाराजांचे बार मोठ्याने वाजत आहे. खातेवाटप झालेले नाही, ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे असा प्रश्न उपस्थित करत गंमत म्हणून अधिवेशन घेतले जात आहे का? जर असे होत असेल तर ही लोकशाहीची थट्टा असल्याची टीका शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली. जनतेमध्ये या सरकारची प्रतिमा ईव्हीएमचे सरकार म्हणून झाली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण, विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा रंगली आहे. मंत्रिपद ज्यांना मिळाले आहे त्यापेक्षा नाराजांचे बार मोठ्याने वाजत असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला टोला लगावला. एक काळ असा होता शाश्वत धर्म, असे काही झाले तर आम्ही हे करणार नाही, ते करणार नाही, असे सांगितले जायचे. पण आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. हा कोणता धर्म हे तेच चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. राज्याचे मंत्रिमंडळ स्थापन केले नाही. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर आता सरकारने लाडके आमदार आणि नावडते आमदार ही योजना सुरू करावी, असेही ते म्हणाले. लाडक्या बहिणींचे पैसे वेळेत द्या ! निवडणूक आटोपली आणि इव्हीएम सरकार सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजना सुरू करुन महायुतीने सांगितल्यानुसार आता २१०० रुपयांचा जो काही बॅकलॉग राहिला असेल तो जमा केला जावा. यामध्ये नावडती आणि आवडती करू नका. हे सगळे काही डाव होते ते आता उघडे झाले आहेत. आता कोणतेही निकष न लावता २१०० रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाले पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.