Satara News : नारीशक्ती वंदन विधेयकावरून भाजपचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Satara News : ऐतिहासिक विधेयकावरून राजकीय रणकंदन! भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत साताऱ्यात भव्य निषेध मोर्चा संपन्न.

Satara News – संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने लोकसभेत मांडलेल्या नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोधकांनी विरोध केल्याने हे विधेयक संमत होऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्यावतीने सातार्यात शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या विधेयकाबाबत विरोधी पक्षांच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवताना पोवई नाका येथील शिवतीर्थावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, नगरसेविका आशा पंडित, पालिकेतील भाजपच्या माजी गटनेत्या सिद्धी पवार, हेमलता भोसले, मोनिका घोरपडे, महिला मोर्चाच्या रिना भणगे, सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार, राहुल शिवनामे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर झालेच पाहिजे, महिलांचा सन्मान करा, विरोधकांचा धिक्कार असो, अशा घोषणांनी शिवतीर्थाचा परिसर दणाणून गेला. मोर्चेकर्यांनी हातात फलक घेऊन, विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी हे विधेयक मंजूर करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली.
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर भाजप महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. नारीशक्ती वंदन विधेयक हे महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांचा राजकीय सहभाग वाढवण्यासाठीचे ऐतिहासिक पाऊल ठरले असते. मात्र, विरोधकांनी महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण करत, लोकसभेत हे विधेयक मंजूर होऊ दिले नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
लोकशाही प्रक्रियेत महिलांना अधिकाधिक संधी मिळावी, त्यांच्या नेतृत्वाला बळकटी मिळावी आणि प्रत्येक क्षेत्रात त्यांचा सन्मान वाढावा यासाठी हे विधेयक तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे. महिलांविषयी संकुचित विचार ठेवणार्या राजकीय प्रवृत्तींचा कडाडून विरोध केला जाईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मोर्चामुळे शहरातील वाहतुकीवर काही वेळ परिणाम झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.





