Satara : कार्यकर्त्यांना ताकद देणार – डॉ. अतुल भोसले

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या स्पर्धेत अजिबात नव्हतो. उलट कराड दक्षिण मतदारसंघात काम करण्याचे माझे उद्दिष्ट स्पष्ट होते. जिल्हाध्यक्षपदासाठी मी इतर काही कार्यकर्त्यांची नावे सुचवली. मात्र, जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली. तो आदेश म्हणून हा पदभार स्वीकारला. यापुढे पक्षात महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानून काम करणार आणि पक्षातील तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ताकद देणार, असा विश्वास भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.
येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, मावळते जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर, कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ इत्यादी यावेळी उपस्थित होते. अतुल भोसले म्हणाले, ‘‘राज्यात महायुतीची सत्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन नेते घेतील त्या निर्णयाचे पालन करणे माझे कर्तव्य आहे. भाजप कार्यकर्ता कामाने मोठा होतो. खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आशीर्वाद सतत माझ्या पाठीशी राहील.
कार्यकर्त्यांना ताकद देऊन सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे माझे उद्दिष्ट स्पष्ट आहे. आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्राधान्य असेल. यापूर्वीच्या जिल्हाध्यक्षांनी पक्ष संघटना वाढवल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले.’’ जिल्ह्यात मोठी विकास कामे आणण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. महायुती म्हणून निवडणुका लढण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे इतर सहकारी पक्षांना सोबत घेऊनच या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
साताऱ्यात दोन्ही राजेंचा निर्णय मान्य
सातारा पालिकेत आघाडी की कमळ चिन्ह असा प्रश्न जिल्हाध्यक्षांना विचारला असता ‘यावर मी बोलू शकत नाही,’ असे म्हणत अतुल भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे पाहिले, तेव्हा ते दोघेही दिलखुलासपणे हसले. आजची पत्रकार परिषद अतुल भोसले यांची आहे, त्यामुळे मी काही बोलणार नाही, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. राजधानीच्या निर्णय साताऱ्याचे दोन्ही राजे घेतात. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे,असे अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.





